इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियाने दिला आधार अन्‌ केले बेजारही

indurikar maharaj
indurikar maharaj

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील इंदुरी हे महाराजांचे मूळ गाव. आई-वडील वारकरी असल्याने त्यांना घरातूनच संप्रदायाचे बाळकडू मिळाले. बी. एस्सी. बी. एड. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन कीर्तनकार म्हणून पेशा स्वीकारला. विनोदातून प्रबोधन हा त्यांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा आहे. मनोरंजनाकडे अधिक झुकणाऱ्या त्यांच्या कीर्तनाला ग्रामीण भागाने पसंती दिली. त्यांचे कीर्तन म्हणजे गर्दी, हे जणू समीकरणच होऊन गेले. २००३ मध्ये त्यांच्या कॅसेट बाजारात आल्या. तेव्हापासून त्यांची ओळख राज्यभर झाली. त्यानंतर वाहिन्या तसेच सोशल मीडियातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वलय वाढत गेले. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांची कीर्तने यू-ट्यूबवर दिसू लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज केवळ शहरी भागातच नव्हे, तर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत पोचले.

वक्तव्यावरून गदारोळ
गेल्या आठवड्यात इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात, ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला संग केल्यास मुलगी होते,’ असे वक्तव्य केले. त्यावरून सध्या राज्यभर गदारोळ सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह काही महिला संघटनांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठविला आहे. दुसरीकडे, महाराजांच्या समर्थनार्थ काही संघटना, संस्था रस्त्यावर उतरल्या आहेत. काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराज खरे समाजप्रबोधक आहेत. त्यांच्यामुळे संस्कृती, धर्म यांच्याबद्दल जनजागृती झाली, गावागावांतील वराती बंद झाल्या, हुंडाबंदीचा प्रचार व प्रसार झाला, वयोवृद्ध माणसांचे प्रश्‍न समाजासमोर आले, तमाशासमोर बसणारा समाज कीर्तनात रमला, शेतकऱ्यांचे महत्त्व समाजाला समजले, गावांमध्ये दारूबंदीचे ठराव केले गेले, अशा आशयाचे दावे त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहेत. तसेच, ते कीर्तनातून मिळणारे पैसे अनाथ मुलांच्या शाळेसाठी, गोशाळेसाठी देतात, असा दावाही त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.

...अखेर दिलगिरी
इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल पहिल्यापासूनच वारकरी संप्रदायात दोन प्रवाह आहेत. वारकरी संप्रदायात कीर्तन ही नारदाची गादी मानली जाते. वारकरी संप्रदायातील काही फड आणि परंपरागत कीर्तनकारांचा इंदुरीकर यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. त्यांची कीर्तन करण्याची शैली, संवाद साधण्याची पद्धत वारकरी संतपरंपरेतील कीर्तनाला छेद देणारी आहे. कीर्तनातील विनोद कनिष्ठपातळीवरचा असतो. विनोदाच्या माध्यमातून महिलांना कमी लेखले जाते, असा त्यांच्याविरोधात मतप्रवाह आहे. एकंदरीत, इंदुरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे ते अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी, ‘मी कीर्तन सोडून शेती करणार,’ असे कीर्तनातून उद्विग्नतेतून सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असतानाच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही महाराजांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अखेर मंगळवारी (ता. १८) इंदुरीकर महाराजांनी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली.

या वादाबाबत काय होईल, हे काळ ठरवेल. परंतु, काही वर्षे ज्या सोशल मीडियामुळे इंदुरीकर महाराज प्रकाशझोतात राहिले, त्यांच्याविरुद्ध गेल्या आठ दिवसांपासून त्याच सोशल मीडियावर सुरू असलेल्या पोस्टमुळे ते बेजार झाले आहेत, हे मात्र वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com