esakal | मनाचिये वारी : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा
sakal

बोलून बातमी शोधा

Palkhi Sohala

मनाचिये वारी : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा

sakal_logo
By
शंकर टेमघरे

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे पालखी सोहळे पुण्यातील पाहुणचार स्वीकारून मार्गस्थ होतात, तो दिवस असतो ज्येष्ठ वद्य एकादशीचा. दोन दिवसांची विश्रांती घेऊन भल्या पहाटेच वारकरी पुणेकरांचा निरोप घेतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वांत मोठा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड. तब्बल ३३ किलोमीटरची वाटचाल, त्यात अवघड दिवेघाट आणि एकादशीचा उपवास. ही वाटचाल म्हणजे वारकऱ्यांची सत्वपरीक्षाच. (Shankar Temghare Writes about Palkhi Sohala)

पण, सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी ही वाटचालही अतिशय लीलया पार करतात. गेल्या काही वर्षांपासून पुणे ते सासवड वाटचालीत पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसतात. आपल्याकडून इतके अंतर चालले गेले, याचेच त्यांना अधिक अप्रूप असते. त्यातही तरुणाईची संख्या अधिक असते. अन्य वेळी एक किलोमीटरभर न चालणारी ही तरुणाई वारीत ३३ किलोमीटरचे अंतर सहज चालून जातात. यामध्ये तुम्ही जर वारकरी होऊन वारीत चालले, तर तुम्ही ही परीक्षा सहज उत्तीर्ण होता. वारीत चालताना तुम्ही जर वारकरी दिंड्यांमध्ये सुरू असलेल्या भजनात, टाळमृदंगाच्या गजरात रममाण होऊन चाललात, तर तुम्ही कधी ३३ किलोमीटर अंतर चालले हे समजणारही नाही. याचा प्रत्यय दिवेघाटात येतो. सकाळपासूनच दिवे घाटात लोक चालत असतात.

मात्र, स्वतंत्र चालताना अनेकजणांची दमछाक होते. मात्र, तुम्ही जर वारकऱ्यांसमवेत दिंड्यांच्या संगतीने चाललात, तर तुम्हाला दिवेघाट कधी चढून जाल ते समजणार पण नाही. हेच वारीचे गमक आहे, असे म्हणावे लागेल. तुम्ही संतांच्या संगतीने देवाचे गुणगान गात जाल तर तुमची वाटचाल ही वाटचाल न ठरता ती साधना ठरते. चालताना कायिक साधना, भजन म्हणताना वाचिक साधना, देवाकडे जाण्याची अखंड ओढ असते, त्यातून मानसिक साधना आपोआप घडते. ही तिन्ही साधना म्हणजेच पंढरीची वारी. त्यातील अवघड टप्पा म्हणजे पुणे ते सासवड ही वाटचाल होय.गेल्या दोन वर्षांपासून हाच दिवेघाट वारकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे वारी रद्द झाल्याने दिवेघाटाला घरी बसलेल्या वारकऱ्यांइतकेच दुःख होत असेल. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणारा हा परिसर आज सुनासुना आहे. पण, प्रत्येक वारकरी घरी बसला असला; तरी आज मनाने निश्चित दिवेघाट चढला असणार, यात शंका नाही. मागील वारीच्या आठवणी त्यांच्या मनाला घरात बसून बळ देत असेल. दिवेघाट चढण्याचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाला वारीची आस आज वाढली असेल, हे निश्चित.

loading image