राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गांधी-नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष : पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गांधी-नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष : पवार

पुणे : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन भिन्न पक्ष असले तरी कॉंग्रेस पक्ष हा महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारधारेवर चालणारा असून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गांधी-नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस यापुढेही गांधी-नेहरूंचे विचार सोडणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता.५) येथे केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ८१ वर्षे पूर्ण करून ८२ व्या पदार्पण केलेले खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या खास सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात शरद पवार यांच्या हस्ते पाटील आणि भावे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर पवार बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन इटकर, रवींद्र डोमाळे, सुनील महाजन प्रशांत पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

खासदार श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमीवर पाटील आणि शिंदे यांनी त्यांच्या भाषणात मित्र शरद पवार यांनी त्यांना राजकारणात कसे आणले, याच्या आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना शिंदे यांनी ते पवार यांच्यामुळे राजकारणात आले. पण नंतर आम्ही पवारांना सोडले. तरीही त्यांच्याशी मैत्री कायम असल्याचा उल्लेख केला होता. हा संदर्भ पकडत पवार म्हणाले, ‘‘शिंदे यांनी आम्हाला (राष्ट्रवादी कॉंग्रेस) सोडले असले तरी, आम्ही (राष्ट्रवादी कॉंग्रेस) त्यांना सोडलेले नाही. कारण शिंदे (कॉंग्रेस) हे गांधी-नेहरूंच्या विचारावर चालणारे असून, आम्ही (राष्ट्रवादी कॉंग्रेस) गांधी-नेहरूंच्या विचारांना मानणारे आहोत आणि यापुढेही हे विचार सोडणार नसून कायम मानणार आहोत.’’

पवार-पाटील मैत्रीचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘‘सर परशुरामभाऊ महाविद्यालयात एका कथ्थक नृत्यांगनेकडून 'हे नृत्य करायलाही अक्कल लागते', अशा जिव्हारी लागणाऱ्या वाक्याची खूणगाठ बांधून थेट रोहिणी भाटे यांच्या नृत्य शाळेत कथ्थकचे धडे गिरवणारा माझा मित्र श्रीनिवास, तर थेट सिक्कीमच्या राज्यपाल पदापर्यंत मजल मारलेला माझा मित्र श्रीनिवास आहे. त्याचे माझ्यावर असलेल्या प्रेमात आजही मला यत्किंचितही फरक आढळून येत नाही. मधुकर भावेंनी देखील आचार्य अत्रेंवर नितांत श्रद्धा ठेवून पत्रकारिता क्षेत्रात एक शिखर गाठले. आज सत्कार करण्यात आलेल्या या दोन्ही सत्कारार्थींनी त्यांच्या श्रद्धा स्थानावर आणि मैत्रीवर जी अढळ निष्ठा दाखवली, त्यामुळे ते या उंचीपर्यंत येऊ शकले.’’

‘अरे मित्रा हात जोड’

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. या मतदारसंघातून शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसचे तेथील माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी पुढाकार घेतला. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठी मिरवणूक काढली. शिंदे यांचा हा पहिलाच अनुभव. त्यामुळे ते या निवडणुकीत इकडे-तिकडे पाहत चालत होते. तेव्हा जगताप यांनी शिंदे यांना उद्देशून अरे मित्रा, तु उमेदवार आहेस, लोकांना हात जोड, असे सांगितले. तेव्हा कुठे शिंदे यांना निवडणुकीत हात जोडावा लागतात, हे समजले, असा एक अनुभव शरद पवार यांनी यावेळी सांगितला.

टॅग्स :Sharad PawarPune News