

नवी दिल्ली, ता.११ : कोणत्याही शासकीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीतासोबतच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज टीका केली. या सुधारित कायद्यामुळे ‘वंदे मातरम्’बद्दल अधिक आदर निर्माण करण्याचा उद्देश साध्य होणार नाही, असे मत त्यांनी ‘एक्स’वर व्यक्त केले.
संसदेत चर्चेविना मंजूर झालेल्या या सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यानुसार, शासकीय कार्यक्रमांच्या प्रारंभी आणि समारोपप्रसंगी राष्ट्रगीतासह संपूर्ण राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
थरूर यांनी निदर्शनास आणून दिले की, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतासाठी प्रेक्षकांना ५२ सेकंद उभे राहावे लागते. मात्र, संपूर्ण राष्ट्रीय गीत गाण्यासाठी ३ मिनिटे १० सेकंद लागतात. तमिळनाडू सरकारने तर या दोन्हींच्या आधी दोन मिनिटांचे राज्यगीत गाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रेक्षक सहा-सहा मिनिटे, असे एकूण १२ मिनिटे शांतपणे उभे राहतील, अशी अपेक्षा आपण करू शकतो का? आदर आणि संयम कायद्याने लादता येतो का? असा सवाल थरूर यांनी ‘एक्स’वर केला आहे.या निर्णयामुळे राष्ट्रीय गीताचा आदर वाढण्याऐवजी उलट परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या दोन्हीचा नितांत आदर करतो. मला राष्ट्रगीत पूर्ण आणि राष्ट्रीय गीताची पहिली दोन कडवी पाठ आहेत. मात्र, उर्वरित चार कडवी आतापर्यंत कधीही अनिवार्य नव्हती. हा निर्णय घेणाऱ्या उत्साही लोकांनी मानवी स्वभावाचा विचार केलेला दिसत नाही.
- शशी थरूर, खासदार,काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.