Women's Day : संशोधनातही ‘ती’ शिखर गाठेल

सम्राट कदम
रविवार, 8 मार्च 2020

सृष्टीच्या सृजनशीलतेचे अमोघ दान निसर्गाने ‘स्त्री’ला प्रदान केले आहे. संशोधनासारख्या सर्जनशील क्षेत्रातील ‘ती’चा प्रवासही चकित करणारा आहे. हा प्रवास ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सुधा वसंत भोरासकर यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडण्याचा एक प्रयत्न.... 

सृष्टीच्या सृजनशीलतेचे अमोघ दान निसर्गाने ‘स्त्री’ला प्रदान केले आहे. संशोधनासारख्या सर्जनशील क्षेत्रातील ‘ती’चा प्रवासही चकित करणारा आहे. हा प्रवास ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सुधा वसंत भोरासकर यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडण्याचा एक प्रयत्न.... 

प्रश्‍न - ‘शोधा’च्या बाबतीत कोणताही लिंगभेद नसतो. संशोधन वृत्तीत तो असतो का? 
डॉ. भोरासकर -
 सर्जनशील विचार करताना व्यक्ती स्वतःचे भौतिक अस्तित्वच विसरते; तर त्यात कसला आलाय लिंगभेद. विज्ञान हे फक्त ‘विज्ञान’च असते, संशोधकाची आवड आणि उत्साह येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करतो. मग, ती स्त्री म्हणून वेगळा विचार असो किंवा वागणूक. मुळात संशोधन वृत्ती ही शास्त्रशुद्ध विचारांचीच घुसळण असते, त्यामुळे अवैज्ञानिक असलेला भेदाभेद तेथे गळून पडतो. अर्थात, काही प्रमाणात याला अपवाद असू शकतो. 

संशोधनात महिलांचे प्रमाण कमी का? गणित आणि भौतिकशास्त्राकडे महिलांचा ओढा कमी का? 
सध्यातरी भारतीय समाजात मुलींच्या उच्चशिक्षणासाठी कोणतीही समस्या नाही; परंतु संशोधनासाठी लागणारा वेळ, पालकांची लग्नाची अपेक्षा आणि तुलनेत इतर क्षेत्रांतील सहजता यामुळे संशोधनक्षेत्रात मुलींचे प्रमाण तुलनेने कमी दिसते. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षिततेचा अभाव महिलांसाठी मोठी समस्या आहे. आधीही ही समस्या होती; पण माध्यमांमुळे सध्या ती प्रकर्षाने आपल्यासमोर येत आहे. मुलींनी स्वतः सक्षम होणे आणि आत्मविश्‍वासाने समाजात वावरणे गरजेचे आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. 

‘स्त्री’चे स्वतःचे वेगळेपण असते. भावनाप्रधान, विनयशीलता, कलात्मकता हा तिच्या स्वभावाचा अभिन्न अंग आहे. त्यामुळे साहजिकच चिकित्सा आणि जीवशास्त्राकडे तिचा ओढा जास्त असतो. तुलनेने गणित आणि भौतिकशास्त्र हे रुक्ष विषय समजले जातात. त्यामुळे साहजिकच महिलांची संख्या या क्षेत्रात कमी दिसते. अशी स्थिती केवळ भारतातच नाही; तर जगभरातही दिसते. सध्याचे चित्र सकारात्मकतेने बदलत आहे. 

मागील पन्नास वर्षांतील महिलांच्या संशोधनातील सहभागाकडे आपण कसे बघता? 
पूर्वी मूलभूत सुविधांसह प्रयोगशाळेतील विविध उपकरणांचा अभाव होता. आज देशातील सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे; परंतु त्या प्रमाणात स्त्रियांमधून संशोधक निर्माण होण्याची प्रक्रिया कमी दिसते. उच्चशिक्षण आणि पीएचडीपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे; परंतु दीर्घकालीन संशोधनात आजही हे प्रमाण कमी आहे. शिक्षणक्षेत्रात महिलांनी सहभाग वाढविणे गरजेचे आहे. कारण शिक्षणच विचारधारा बदलते आणि विज्ञान लोकांची मानसिकता! संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी वेगळी संशोधन छात्रवृत्ती सुरू करणे, विद्यापीठ स्तरावर पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीसाठी विशेष शिष्यवृत्ती सुरू करणे गरजेचे आहे; शिष्यवृत्तीचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. 

भारतीय ‘स्त्री’ जागतिक स्तरावरील संशोधनाचे नेतृत्व करेल का? 
सध्यातरी त्याबद्दल विधान करणे योग्य होणार नाही. जागतिक स्तरावरील सुविधांचा अभाव, मूलभूत संशोधनातील महिला संशोधकांची संख्या, संशोधनासाठी निधी उभारण्यात येणाऱ्या अडचणी, संशोधन सोडता इतर कामात जाणारा वेळ हे सर्व बघता सध्यातरी नेतृत्व करेल अशी स्थिती नाही; परंतु वैद्यकशास्त्र आणि जीवशास्त्रात महिला चांगली कामगिरी बजावत आहेत. निश्‍चितच भविष्यात जागतिक स्तरावर भारतीय महिला नेतृत्व करेल, असे प्रयत्न करायला हवेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She will also reach the pinnacle in research