थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

युनूस तांबोळी
Tuesday, 28 July 2020

दुपारची वेळ होती...पावसाची रिपरीप होऊन गेल्याने गवत ओले झाले होते. पण, चाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागतेच. त्यामुळे भर दपारी उसाच्या क्षेत्राजवळ मेंढ्या चरण्यास सोडल्या होत्या. मात्र, दबा धरलेल्या बिबट्याने अचानक

टाकळी हाजी (पुणे) : दुपारची वेळ होती...पावसाची रिपरीप होऊन गेल्याने गवत ओले झाले होते. पण, चाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागतेच. त्यामुळे भर दपारी उसाच्या क्षेत्राजवळ मेंढ्या चरण्यास सोडल्या होत्या. मात्र, दबा धरलेल्या बिबट्याने अचानक माझ्या जवळच असणाऱ्या मेंढीवर झडप घातली. अगोदर घाबरलो, पण स्वतःला सावरत हातातील काठी आपटत बिबट्या मागे धावलो. बिबट्याने मेंढी सोडली होती, पण मानेला जखम झाल्याने मेंढी दगावली. बिबट्याने देखील धूम ठोकली. अशा शब्दांत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ढगेवस्तीजवळ मेंढपाळ बारकू रोहिले यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सांगितला. 
 
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात डिंभे उजवा कालवा व घोड नदी वाहत आहे. या परिसरात पाणी फिरले आहे. त्यामुळे बहुतेक परीसरात शेतकरी ऊसाचे पीक घेताना दिसतो. रोहिलवाडी व ढगेवस्ती या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उसाचे व डाळिंबाचे क्षेत्र आहे. हे पीक हमखास उत्पन्न मिळून देणारे असले, तरी देखील बिबट्याला या परिसराचा चांगलाच आडोसा तयार झाला आहे. रविवारी (ता. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास मेंढपाळ बारकू शेटीबा रोहिले हा मेंढपाळ ढगेवस्तीजवळ मेंढ्या चारत होता. त्यावेळी अचानक उसाच्या क्षेत्रात दबा धरलेल्या बिबट्याने कळपातील एका मेंढीवर हल्ला केला. या मेंढीला ओढत नेत असताना या मेंढपाळाने काठीच्या सहाय्याने 
त्याचा पाठलाग केला. त्यावेळी बिबट्याने मेंढीला ठार मारून परिसरातील उसाच्या क्षेत्रात धुम ठोकली. रोहिले यांनी पाठलाग केल्याने बिबट्याने मेंढीला सोडले असले, तरी मेंढी ठार झाल्याने या मेंढपाळाचे नुकसान झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक ऋषीकेश लाड यांनी तत्काळ या ठिकाणी भेट देऊ पंचनामा केला. या शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले आहे. पाण्याच्या व्यवस्थापनामुळे शेतकरी विविध उत्पादनाच्या माध्यामातून आर्थिक स्थर वाढविण्याचा प्रयत्न करतात. या परिसरात मेंढपाळ व्यवसायिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र,  बिबट्याचा संचार त्यांना धोकादायक ठरू लागला आहे. दिवसाढवळ्या होणारे हे बिबट्याचे हल्ले थांबविले पाहिजे. अन्यथा मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता आहे, असे पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheep killed in leopard attack in Shirur taluka