
बाळंतपणासह विविध कारणांमुळे करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्यांना पुन्हा नोकरी शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
‘शीवर्क’ स्टार्टअप कंपन्यांना उपलब्ध करून देतेय २० हजारांहून अधिक कौशल्य
पुणे - मातृत्वानंतर जगातल्या असंख्य महिला नोकरी सोडून देतात. तर बाळंतपणानंतर ज्या महिला कामावर परततात त्यांपैकी अनेक जणी पुढील तीन महिन्यांत नोकरी सोडून देतात, असे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. अशा महिलांसाठी ‘शीवर्क’ (SheWork) हे कम्युनिटी व्यासपीठ कंपन्यांना २० हजारांहून अधिक कौशल्य (स्किल) उपलब्ध करून देते.
बाळंतपणासह विविध कारणांमुळे करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्यांना पुन्हा नोकरी शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतःच्या तब्येतीचा आणि मुलांचा सांभाळ करून फ्रेंडली वातावरणात काम करण्यास मिळेलच असे नाही. या बाबींचा विचार करीत पुण्यातील एक स्टार्टअप आयटी क्षेत्रातील कुशल महिलांना चांगला पगार आणि दर्जेदार संधी मिळवून देत आहे. कामाच्या ठिकाणी ताण आणि चिंता नसेल व महिलांसाठी आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्माती करण्याचा ‘शीवर्क’ स्टार्टअपचा उद्देश आहे. २०१९ मध्ये तेजस कुलकर्णी आणि पूजा बांगड यांनी याची सुरवात केली, तेव्हा तेजस यांचे वय २६ आणि पूजा या २४ वर्षांच्या होत्या. या स्टार्टअपच्या माध्यमातून १०० नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पूजा यांनी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे, तर तेजस यांनी युकेमधून ‘सायबर नेटिक्स अँड कम्युनिकेशन’ या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.
या क्षेत्रांना मागणी...
डेव्हलपर
टेस्टिंग
डिजिटल मार्केटिंग
डेटा सायन्स
प्रोजेक्ट मॅनेजमेंट
कौटुंबिक आयुष्याचा समतोल
लिंक्डइनने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, दहापैकी सात महिला कामाच्या बाबतीत लवचिकता नसल्यानं नोकरी सोडून देण्याच्या विचारात आहेत. मात्र, शीवर्कमुळे कामाचे अनेक पर्याय (उदा. कामाच्या उपलब्धतेनुसार, ३ ते ६ महिन्यांसाठी, ६ ते ११ महिन्यांसाठी, कायमस्वरूपी) उपलब्ध होतात आणि आपापल्या कार्यक्षेत्रात भरारी घेताना कौटुंबिक आयुष्याचा समतोलही राखला जातो, तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून कंपन्यांना कौशल्य असलेल्या आणि अनुभवी महिलांचे मनुष्यबळ उपलब्ध होते. तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी काम करावे, यासाठी स्टार्टअप प्रयत्नशील आहे.
नोकरी सोडल्यानंतर पुन्हा मनासारखा जॉब मिळणे सोपे नसते. त्यासाठी महिलांना अनेक प्रयत्न करावे लागतात. ही सर्व प्रक्रिया अनेकींना त्रासदायक ठरते. त्यामुळे शीवर्क हे निवडीचे आणि नियुक्तीचे परंपरागत पर्याय वगळून या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करीत आहे. महिलांना त्यांच्या आवडीचे प्रोजेक्ट मिळवून देणारे पर्याय आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणले आहेत. कौशल्यवृद्धी तसेच अनेक नवी कौशल्य शिकवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. महिलांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
- पूजा बांगड व तेजस कुलकर्णी, सह-संस्थापक, शीवर्क