

शिक्रापूर, ता. १० : शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायत कार्यालयात ५ ऑक्टोबर रोजी शिरूर पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे यांनी नागरिकांची बैठक घेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार येथील माजी उपसरपंच मयूर खंडेराव करंजे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे नुकतीच केली.
शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत पाणीटंचाईच्या प्रश्नावर एक बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत नियोजित विषयांशिवाय मागील ग्रामपंचायत कारभारावर गैरव्यवहाराचे आरोप, गावातील विकासकामे, कचरा व पाणीप्रश्न, तसेच आगामी सत्तेबाबत वक्तव्ये केली आहे. ‘मला यावेळी सत्ता मिळाली तर समस्या सोडवू शकतो,’ तसेच पंचायत समितीकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगून मोठी विकासकामे करण्याची घोषणा सासवडे यांनी केली. या शिवाय कचरा शेडच्या भाड्याप्रकरणी मयूर करंजे, रवींद्र पाटील आणि विजय काळे यांच्यावर एक लाख रुपये कमिशन घेतल्याचा आरोप सासवडे यांनी केला, अशी तक्रार करंजे यांनी केली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार टंचाई आढावा बैठक आम्ही घेतली. मुख्य बैठकीनंतर अनौपचारिक गप्पा म्हणजे बैठक नसते, एवढी तरी संबंधित तक्रारदारांना समज असावी, असे मी समजतो. मात्र, त्यांच्याच तक्रारीतील मुद्द्यांनुसार काही तथ्यांश असेल तर गावापुढे त्यांनी खुलासा करावा. उगाच राजकीय पोटदुखी का करून घ्यावी?
- रामभाऊ सासवडे, उपसभापती, पंचायत समिती, शिरूर