

सणसवाडी, ता. २४ ः शिक्रापूर-सणसवाडी (ता. शिरूर) परिसरातील औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत मूलभूत पायाभूत सुविधा सक्षम नसल्याचे चित्र आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, कचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा आदी अडचणींचा उद्योजक, कामगार तसेच परिसरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे.
औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांची झीज, खड्डे आणि वाहतुकीची कोंडी हे प्रश्न उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करणारे आहेत. सणसवाडी-पिंपळे जगताप रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी काढली. मात्र अंतर्गत मार्गांच्या नियमित डागडुजी, दुरुस्तींच्या बाबतीत ना पीएमआरडीए गंभीर आहे ना सार्वजनिक बांधकाम खाते अशी स्थिती आहे.
पुरेशा दाबाने पाणीपुरवठा गरजेचा
उद्योगांना आवश्यक असलेला पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास उत्पादन प्रक्रियेबरोबरच कामगारांच्या दैनंदिन गरजांवरही परिणाम होतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, उपलब्धता आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराचा विचार करून स्वतंत्र नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कागदावर
औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया आणि विल्हेवाट हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. सणसवाडी क्लस्टरसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असल्याची नोंद पीएमआरडीएच्या कागदपत्रात आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार, त्याची क्षमता किती असेल आणि उद्योगांना त्याचा लाभ कसा मिळणार, याकडे लक्ष आहे.
कचरा व्यवस्थापनाचे आव्हान
औद्योगिक परिसरातील घनकचरा, प्लास्टिक आणि औद्योगिक कचऱ्याची स्वतंत्र व नियमबद्ध विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सणसवाडी परिसरात कचरा साठवणुकीवरून स्थानिक पातळीवर विरोधही झाला आहे.
अग्निशमन केंद्राची मागणी
सणसवाडी परिसरात यापूर्वी औद्योगिक आगीच्या घटना घडल्या आहेत. २०२५मध्ये इंडिका इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत आसपासच्या १० ते १५ कंपन्यांनाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्वतंत्र अग्निशमन केंद्र, पुरेसे बंब, जलस्रोत आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. सणसवाडी परिसरासाठी अग्निशमन केंद्राची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे.
‘दावोस’ला ७५० कोटींची गुंतवणूक पण....
‘दावोस’ येथे ७५० कोटींची परकीय गुंतवणूक करवून घेतलेल्या राज्य सरकारला येथील हर्षवोगल कंपोनंट्स कंपनीच्या नवीन प्लॅंट्साठी पुरेसा विजपुरवठा नसल्याचे सांगावे लागत आहे. पर्यायाने सदर कंपनी वैतागली असून त्यांनी आपली तक्रार डीसीसीआय या उद्योगांच्या संघटनेकडे केलेली आहे. या संघटनेकडून सदर तक्रारीचे निवेदन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले असून एवढ्या मोठ्या गुंतवणूकीनंतर अशी परिस्थिती येत असेल तर राज्यात नवे उद्योग कसे येणार हा मोठा प्रश्न आहे.
समस्या
- अंतर्गत रस्त्यांची नियमित देखभालीकडे दुर्लक्ष
- पथदिव्यांचा अभाव
- सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था मर्यादित
- आपत्कालीन रस्ते व प्रवेशमार्ग व्यवस्था नाही
आमच्या कंपनीने सणसवाडीत ७५० कोटी एवढी अतिरिक्त नव्याने गुंतवणूक केलेली आहे. मात्र येथील इसार सबस्टेशनमध्ये पुरेसा वीजभार शिल्लक नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. वीज ही मुलभूत गरज आहे तरच उद्योग वाढतील, टिकतील आणि स्थिरावतील.
-अॅड. मारुती पाटील, प्रशासकीय अधिकारी, हर्षोगल हर्षवोगल, सणसवाडी
दररोजचा वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका गंभीर झालाय की, आता कंपन्यांच्या वेळा पाळणेही कठीण होतेय. अर्थात या मार्गावर आता उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असे म्हटले जात असल्याने आम्ही आणखी धास्तावलेलो असून या बांधकामावेळी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय केलेली आहे, त्याबाबत आणखी चिंता वाटतेय.
- एच. पी. श्रीवास्तव, अध्यक्ष, डेक्कन चेंबर्स कॉमर्स अॅंड अॅग्रीकल्चर, पुणे-नगर रस्ता
काही कंपन्यांचे वीजप्रश्न आहेत. रांजणगाव येथे नव्याने ५० केव्हीचे नवीन सबस्टेशन अंतिम टप्प्यात असून ते पुढील दोन महिन्यात सुरू होईल. त्यानंतर या भागातील कुठल्याही कंपनीला वीजदाब व वीजपुरवठा कमी पडणार नाही.
- सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.