भोसे : बेलोशीत ''शिमगोत्सवाचा'' जल्लोष; वाघ-अस्वलांच्या सोंगांनी वेधले लक्ष ​गावागावातून निघाली पारंपरिक सोंगे; अंगावर चितारले ''होळीचे'' सामाजिक संदशुभेच्छा

भोसे : बेलोशीत ''शिमगोत्सवाचा'' जल्लोष; वाघ-अस्वलांच्या सोंगांनी वेधले लक्ष ​गावागावातून निघाली पारंपरिक सोंगे; अंगावर चितारले ''होळीचे'' सामाजिक संदशुभेच्छा

Published on

बेलोशीत ​परंपरेचा अनोखा आविष्कार

शिमगोत्सवाचा जल्लोष; वाघ-अस्वलांच्या सोंगांनी वेधले लक्ष ​

भोसे, ता. ३ : बेलोशी (ता. जावळी) येथे पारंपरिक शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते गावातील तरुणांनी आणि मुलांनी घेतलेली विविध सोंगे. वाघ, अस्वल, राक्षस आणि विविध देवदेवतांची रूपे धारण करून मुलांनी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली आणि ग्रामस्थांचे प्रबोधनासह मनोरंजन केले.
होळीच्या सणानिमित्त बेलोशीमध्ये वर्षानुवर्षांची सोंगे घेण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. यंदाही गावातील मुलांनी एकत्र येत वाघ, अस्वल यांसारख्या हिंस्र प्राण्यांची हुबेहूब सोंगे साकारली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिट्ट्यांच्या आवाजात ही सोंगे जेव्हा गल्लीबोळातून बाहेर पडली, तेव्हा आबालवृद्धांची त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. केवळ मनोरंजनच नव्हे, तर पौराणिक कथांमधील राक्षस आणि देवदेवतांच्या भूमिकेतून मुलांनी संस्कृतीचे दर्शन घडवले. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशा घोषणा देत ही सोंगे प्रत्येक घरासमोर जात होती. घरोघरी गेल्यानंतर पारंपरिक पद्धतीने ‘बोंब’ मारून त्यांनी वातावरणात एकच चैतन्य निर्माण केले. जुन्या जाणत्या ग्रामस्थांनीही मुलांच्या या उत्साहाला दाद देत त्यांचे स्वागत केले.
या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे काही तरुणांनी अंगावर कपडे न ठेवता संपूर्ण शरीरावर विविध रंगांनी चित्रे रेखाटली होती. रंगांच्या माध्यमातून त्यांनी शरीरावर होळीचे महत्त्व, झाडे लावा-झाडे जगवा आणि व्यसनमुक्ती यांसारखे सामाजिक संदेश दिले होते. कलेच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात आजही लोककला जिवंत असल्याचे या सोंगांमधून दिसून आले. आधुनिकतेच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकलेली तरुण पिढी आपली संस्कृती विसरू नये, या उद्देशाने बेलोशीतील मुलांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे. दिवसभर चाललेल्या या सोंगांच्या खेळामुळे बेलोशीचे वातावरण शिमगामय झाले होते.

B07367
बेलोशी : अशा प्रकारे मुलांनी सोंगे काढून मनोरंजन केले. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com