शिरसगाव काटामधील यशस्वी 105 जणांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने गावातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, लष्कर, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या सुमारे 105 जणांना "विशेषरत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गुनाट (शिरूर): प्रतिकूल परिस्थितीत कष्ट आणि संघर्षाच्या जोरावर आपण आयुष्यात यशस्वी झालो, तरी गावातल्या मातीशी असलेली नाळ तोडू नका. यशस्वी झालेल्यांनी गावातील दीनदुबळ्यांना तसेच भविष्याच्या उज्ज्वल स्वप्नांसाठी झटणाऱ्या तरुणांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने गावातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, लष्कर, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या सुमारे 105 जणांना "विशेषरत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार पवार बोलत होते. उद्योजक प्रभाकर साळुंके, डॉ. अखिलेश राजूरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रवी काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुधीर फराटे, माजी जि.प.सदस्य  दादासाहेब कोळपे, माजी  संचालक नरेंद्र माने, बाजारसमिती संचालक  नरेंद्र माने,  सरपंच पल्लवी जगताप, तात्यासाहेब सोनवणे, शीतल गायकवाड, माणिक कदम आदी या वेळी उपस्थित होते. राहुल कदम, सतीश केदारी, किरण काटे, जयदीप पवार, सचिन आवारे, सचिन विधाते, काशिनाथ काटे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. जयवंत भगत यांनी सूत्रसंचालन केले. दत्तू लोंढे यांनी आभार मानले.

...आणि गावही भारावले
कोणी नामांकित उद्योजक, तर कोणी डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर, लष्करी सेवेत उच्चपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी अशा विविध क्षेत्रांत गावचा नावलौकिक जिल्हाभर गाजविणारी एक नव्हे, तर शंभरावरील गावातीलच अधिकारी गावकऱ्यांनी प्रथमच एकत्र पाहिले. आणि काही क्षण एवढे अधिकारी आपल्याच गावात..! या सुखकर भावनेने ग्रामस्थही भारावून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shirasgaon kata 105 officer homage at shirur