

शिर्डीत पेढेविक्रेत्यांवर
अन्न व औषध प्रशासनाचा छापा
सहा विक्रेत्यांकडील पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भेसळ प्रतिबंधक पथकाने बुधवारी शिर्डीतील पेढेविक्रेत्यांवर छापेमारी केली. या कारवाईत सुमारे ५०० ते ६०० किलो पेढे तसेच अन्य मिठाईचे नमुने ताब्यात घेण्यात आले. देवस्थान परिसरातील आठ ते दहा दुकानांची तपासणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत केवळ पेढे व काही पॅकबंद खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून, अद्याप कोणत्याही विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
काही दिवसांपूर्वी शिर्डीतील पेढे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरही अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकले होते. त्या कारवाईनंतर भेसळ प्रतिबंधक पथकाने पुन्हा एकदा विक्री केंद्रांवर धडक कारवाई केली. अचानक झालेल्या तपासणीमुळे पेढेविक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली.
तपासणीदरम्यान पेढ्यांच्या विक्रीसंदर्भातील काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच पेढ्यांचा दर्जा, त्यामध्ये वापरण्यात आलेले घटक आणि अन्नसुरक्षा निकषांची पूर्तता झाली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यापूर्वी संबंधित दुकानांचा पंचनामा करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात पेढे ताब्यात घेण्यात आले असले, तरी प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत कोणतीही अंतिम कारवाई करण्यात येणार नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.