

चोंडी, शिर्डी, शिंगणापूरच्या विकासकामांना गती द्या
डॉ. पंकज आशिया ः नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा आढावा
अहिल्यानगर, ता.१० ः चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन, तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी आशिया यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत चोंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकासकामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.
चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विविध कामांचा, तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. स्मृतीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले, तसेच पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. प्रस्तावित आराखड्यासाठी आवश्यक जागा भूसंपादित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही आशिया यांनी दिल्या.
इन्फो
पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने करा
नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डी व शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक पार्किंगची जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. घोडेगाव एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी किती जमीन उपलब्ध होऊ शकते, तसेच त्या ठिकाणी किती वाहनांची पार्किंग क्षमता निर्माण करता येईल, याची प्रत्यक्ष खातरजमा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शिर्डी नगरपरिषद अंतर्गत शहरातील रस्त्यांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. आशिया यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.