शिरूरला शुभेच्छा संदेशांनी परीक्षा केंद्रे फुलली
शिरूर, ता. २० : शालेय जीवनाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज शिरूर शहर व तालुक्यात शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात झाली. या वेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुतांशी परीक्षा केंद्रांवर त्यांच्या पालकांसह मित्र परिवाराने गर्दी केली होती. परीक्षार्थींना पेन, गुलाबाची फुले देण्यासाठी आलेल्या मित्रमंडळी, शिक्षक व पालकांच्या ‘बेस्ट ऑफ लक’च्या शुभेच्छा संदेशांनी परीक्षा केंद्रे फुलून गेली होती.
दहावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यात १५ ठिकाणी विविध शाळांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली असून, या केंद्रांवर मिळून एकूण सहा हजार ६९७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तालुक्यातील शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला या केंद्रावर सर्वाधिक ७६९ तर केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे या केंद्रावर सर्वात कमी १३५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या केंद्रावर सातशे व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ६०४, न्हावरे येथील मल्लिकार्जुन विद्यालयात ५७३, मलठणच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ४३०, कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूलमध्ये ४५४, जातेगाव बुद्रूकच्या श्री संभाजीराजे विद्यालयात ५४७, तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक आर. बी. गुजर प्रशालेत ६०३, वडगाव रासाई येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात २२१, करडे येथील भैरवनाथ विद्यालयात ४५०, निमगाव म्हाळुंगी येथील विद्याविकास मंदिरात २९१, टाकळी हाजीच्या बापूसाहेब गावडे विद्यालयात ३३७, मांडवगणच्या वाघेश्वर विद्याधाममध्ये २४६ तर सणसवाडीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ३३७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
शिरूर तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर आज सकाळी दहावीच्या परीक्षेला उत्साहात सुरूवात झाली असल्याची माहिती तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रितम कोकणे यांनी दिली. कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात केले असून, काही ठिकाणी भरारी पथकामार्फतही कॉपी प्रकरणांवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळकृष्ण कळमकर हे परीक्षा परीरक्षक म्हणून काम पाहात असून, एकूण दहा केंद्र संचालकांमार्फत दहावीच्या परीक्षेचे संयोजन केले जात आहे.
दरम्यान, आज येथील विद्याधाम प्रशालेच्या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, विद्याधामचे मुख्याध्यापक गुरूदत्त पाचर्णे, राजेंद्र बनकर, संध्या औटी, विजय लगड, विजय शिर्के या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जाकीरखान पठाण, मुख्याध्यापक एस. एच. मचाले व पालक संघांकडून विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

