Dilip Walse Patil inspects drought-affected crops and interacts with farmers in Pabal and surrounding villages of Shirur taluka.
esakal
पाबळ, : पावसाने ओढ दिल्याने शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, धामारी, वरूडे व मोराची चिंचोली परिसरातील गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपण्यास सुरुवात झाली असून, सोयाबीन, बटाट्यासह विविध पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (ता. ३) नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची स्थिती, पाणी व चाऱ्याची उपलब्धता तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसाअभावी पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, अनेक ठिकाणी उभी पिके जळून चालली असल्याने मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना वळसे पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळसदृश परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
या कठीण काळात शेतकरी बांधवांनी चिंता करू नये. शासन-प्रशासनाकडून शक्य ती जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत," असा विश्वास वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती सदस्या वंदना पवार, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, सदाशिव पवार, राजेंद्र जासूद, बबन शिंदे, प्रमोद पऱ्हाड, सोपान जाधव, प्रवीण ढोकले, संतोष लंघे, विमल नाणेकर, भास्कर पुंडे, सुधीर पुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.