Google भाऊ, माझ्यासारख्या मावळ्याची ही स्थिती तर महाराजांना काय वाटत असेल? : अमोल कोल्हे

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

फक्त गुगलवरील चुकीच्या माहितीमुळे खासदार कोल्हे यांना शुभेच्छांचे मेसेज, कॉल येत आहेत. 

पुणे: जर एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा वाढदिवस असेल तर त्यांचे चाहते किंवा कार्यकर्त्यांचा होर्डिंग लावून शुभेच्छा देणे, फोन किंवा मेसेजद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटणे हा नित्याचाच कार्यक्रम. तो पूर्ण दिवस वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे आणि त्यांचे आभार व्यक्त करण्यात जात असतो. समजा जर एखाद्या राजकीय व्यक्तीचा वाढदिवस दोनदा आला तर काय होईल? आता असा प्रसंग महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका खासदारासोबत घडला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गुगलच्या चुकीमुळे एका अजबच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 

झालं असं की गुगलवरील चुकीच्या माहितीमुळे खासदार अमोल कोल्हे यांना आज (दि.18)सकाळपासूनच वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस नाही. पण फक्त गुगलवरील चुकीच्या माहितीमुळे खासदार कोल्हे यांना शुभेच्छांचे मेसेज, कॉल येत आहेत. 

याबद्दलची माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट करुन दिली आहे. या पोस्टमध्ये खासदार कोल्हे यांनी लिहिले आहे की, "एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच! वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहेत...त्या सर्वांचा ऋणी आहे.." 

सकाळपासून येत असलेल्या शुभेच्छांबद्दल खासदार कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले आहे. पण त्यांनी गुगलवर मजेशीर टिप्पणीही केली आहे. त्याचबरोबर सर्वांना विचार करायलाही भाग पाडले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, "परंतु Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी नाही पडत...बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही! सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल?"

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावर अनेक मत-मतांतरे आहेत. त्याचा संदर्भ खासदार कोल्हे यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या पोस्टमधून दिला आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shirur mp amol kolhe on his second birthday in year