esakal | शिरूर : कान्हूर मेसाईमध्ये तब्बल 103 दिवसांपासून शाळा सुरु । school
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर : कान्हूर मेसाईमध्ये तब्बल 103 दिवसांपासून शाळा सुरु

शिरूर : कान्हूर मेसाईमध्ये तब्बल 103 दिवसांपासून शाळा सुरु

sakal_logo
By
युनूस तांबोळी ः सकाळ वृत्तसेवा

शिरुर : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गेल्या १०३ दिवसांपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू असून, कोरोनाला शाळेबाहेर ठेवण्यात विद्यालयाला यश आले आहे. सध्या विद्यालयात घटक संच चाचणी परीक्षा सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयोजन करून परीक्षा पार पडत आहे. प्रत्यक्ष शिक्षण मिळाल्यामुळे परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा: सफाई कामगाराची मुलगी बनली 'तहसीलदार'

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण ह्या विद्यालयात ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने यावर्षी ही शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात यश आले आहे. प्रत्यक्ष शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एक भावनिक अतूट नाते निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात ९८% उपस्थिती असते. यावेळी विद्यार्थ्यांची दररोज आरोग्य तपासणी केली जाते. यापूर्वी पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन वेळा सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.

हेही वाचा: संजय गांधी निराधार योजनेची बैठक न झाल्याने लाभार्थी वंचित- आरडे

विद्यालयाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परिसरातील युवकांसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू केली असून, त्यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. गेल्या १०३ दिवसांत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसून कोरोनाला शाळेबाहेर ठेवण्यात विद्यालयाला यश आले आहे.

पालकांचा उत्तम प्रतिसाद व शिक्षणाविषयी आस्था असल्याने व शिक्षकही सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व परीक्षांचे वर्ग नियमित सुरू आहेत. गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी पालकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी विद्यालय आटोकाट प्रयत्न करीत असून, त्याला यश येत आहे.

loading image
go to top