शिरूरचे आमदार आणि प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये

शिरूरचे आमदार आणि प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये

शिरूर : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यातील दहा गावांत उद्या (ता. १५) पासून 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत सर्व व्यक्तींची तपासणी केली जाणार असून, कोरोनाची लक्षणे आढळणारांना तातडीने विलग करून उपचारासाठी दाखल केले जाईल. या मोहिमेसाठी ११० पथके तैनात केली असून, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरूर तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याबाबत आमदार ॲड. अशोक पवार यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी आमदार पवार यांच्यासह काल शिरूरसह; शिक्रापूर, पाबळ, मलठण या गावांना भेटी देऊन कोरोनाचा आढावा घेतला.

या भागातील कोवीड केअर सेंटर मधील स्थितीची माहिती घेतली. शिक्रापूर येथे झालेल्या सर्व संबंधित विभागाच्या बैठकीत 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्याच्या अनेक भागांत ही मोहिम राबविण्यास सुरवात केली असून, हाॅटस्पाॅट ठरलेल्या गावांतील सर्वच व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. स्वॅब टेस्टिंगनंतर काही तासांतच लगेच रिपोर्ट असे या मोहिमेचे स्वरूप असून, त्यातून बाधित झालेल्या व्यक्ती इतरांना संसर्ग पोचवण्यापूर्वीच बाजूला करणे सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काटेकोरपणे ही मोहिम राबवित असून, त्यातून कोरोनाला निश्चीत आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मोहिमेअंतर्गत शिरूर शहर व ग्रामीण परिसर, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कोरेगाव भीमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, मांडवगण फराटा, तर्डोबाची वाडी व धामारी या गावांची पहिल्या टप्प्यात निवड केली असून  कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने या गावांतील सर्व कुटूंबातील सर्वांची अन्टीजेन टेस्ट केली जाईल. त्यातून कोरोनाची लक्षणे आढळणारांचे तातडीने विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जातील. त्यासाठी तालुक्यात सात ठिकाणी उपचार केंद्रांची व दहा रूग्णवाहिकांची व्यवस्था केली असल्याचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसिलदार लैला शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे उपस्थित होते.

कोरोनाचे उच्चाटन करण्याकामी राज्य शासन गांभीर्याने पावले उचलत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याकामी प्राधान्य दिले आहे. तातडीच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे सर्वच आमदारांना आश्वासित केले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात सर्व यंत्रणांनी समन्वयाने या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करावेत. याकामी राज्य शासनाकडून निधी मिळवून देऊ.-ॲड. अशोक पवार, आमदार, शिरूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com