पुणे महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरतील हे दोन फॅक्टर?

२०२१ मध्ये हद्दवाढ होऊन भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या या महानगरावर यापुढे उपनगरांचे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नगरसेवकांचे वर्चस्व राहील.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

२०२१ मध्ये हद्दवाढ होऊन भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या या महानगरावर यापुढे उपनगरांचे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नगरसेवकांचे वर्चस्व राहील.

पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना १३ मे रोजी रात्री जाहीर झाली. २०२१ मध्ये हद्दवाढ होऊन भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या या महानगरावर यापुढे उपनगरांचे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नगरसेवकांचे वर्चस्व राहील, असे आजची राजकीय परिस्थिती सांगते.

उपनगरात सत्तेची गणितं गुंठामंत्र्यांभोवती

हद्दवाढीनंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत पूर्णपणे नव्याने बनलेले पाच प्रभाग येतात. वाघोली-इऑन आयटी पार्क, मांजरी-शेवाळवाडी, फुरसुंगी, खडकवासला-नऱ्हे, धायरी-आंबेगाव या सर्व प्रभागांत पक्षाच्या करिष्म्यापेक्षा स्थानिक ताकदीच्या उमेदवारांवर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील. त्यामुळे अधिक ताकदीचा उमेदवार आपल्या पारड्यात पाडून घेण्याची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपचीही असेल.

ठरावीक नेत्यांची मक्तेदारी कायम

पूर्व भागातील (विशेषतः वडगावशेरी) प्रभाग रचनेत न झालेले बदल, तर ३२ प्रभागात झालेले लक्षणीय बदल लक्षात घेतले तर नव्या रचनेत ठरावीक प्रस्थापितांची मक्तेदारी कायम राहिली आहे, हे लक्षात येते. यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीची गणितं पक्ष आणि या नेत्यांभोवतीच फिरताना दिसतील. यात विकासाचे मुद्दे मागे पडू नयेत ही जबाबदारी मतदारांची असेल.

काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न

नव्या प्रभागरचनेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाल्यास, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची पहिली लढाई अंतर्गत असेल. नव्या रचनेत ताकदीच्या स्थानिक उमेदवारांवर भिस्त असणाऱ्या राष्ट्रवादीचा वरचष्मा नाकारता येणार नाही. त्यामुळे जागावाटपात मागील निवडणुकीतल्या विजयी जागांचा आधार घेतला तर सुमारे २५पेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेसला शिवसेनेसाठी आपल्या पारंपरिक जागांवर पाणी सोडावे लागू शकते. त्यातून आगामी लोकसभेसाठी पुण्याच्या जागेवर काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीच्या तुलनेत कमजोर होण्याची शक्यता आहे.

मुस्लिम मतांची निर्णायकी खेळी

प्रभागरचनेत येरवडा, पुणे स्टेशन-ताडीवाला रोड, शनिवार वाडा-कसबा पेठ, कासेवाडी-हरकानगर या चारही प्रभागांत मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायकी ठरेल. नवीन निश्चित रचनेत या मतदारसंघांच्या रचनेत बदल झालेले नाहीत. २०१७च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती आणि काँग्रेस-‘एआयएमआयएम’च्या मतांची विभागणी होऊन येरवड्यातून शिवसेनेला अधिक जागा मिळवता आल्या. आकाराने सर्वात मोठा प्रभाग बनलेल्या येरवड्यात हिंदू-मुस्लिम अशी मतांची विभागणी स्पष्ट दिसते. शिवाय युती नसताना ताकदीचे उमेदवार देण्याचे आवाहन भाजपसमोर असेल. महाविकास आघाडीत काँग्रेसला पारंपरिक मतदार शिवसेनेसाठी सोडावा लागेल का?, या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात मिळेलच. कासेवाडी-हरकानगर भागात दलित-मातंग मतांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी करण्यावर प्रस्थापितांचा भर अधिक राहील. शनिवार वाडा-कसबा या भागात भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील प्रस्थापितांमध्ये थेट लढत होईल.

पुणे स्टेशन-ताडीवाला रोड या भागात निर्णायकी मुस्लिम मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य कायम राहील. या प्रभागात बसपाच्या मतांच्या विभागणीचा फटका २०१७मध्ये भाजपला बसला होता. याशिवाय, कोंढवा खुर्द-मिठानगर आणि सय्यदनगर-लुल्लानगर या भागातूनही मुस्लिम मते निकालावर थेट परिणाम करतील. यापैकी कोंढवा खुर्द-मिठानगर प्रभागात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मुस्लिम नगरसेवक आहेत तर याच प्रभागातून २०१७ मध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील निवडून आले. सय्यदनगर-लुल्लानगर भागातूनही पूर्णपणे मुस्लिम मतदारच निवडणुकीचा निकाल निश्चित करतील, असे चित्र दिसते. या भागातून मुस्लिम उमेदवाराला संधी मिळाली तर मुस्लिम नगरसेवकांची संख्याही आगामी निवडणुकीत वाढेल. या दोन्ही प्रभागांतर्गत येणाऱ्या भागात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांचे पारंपरिक विरोधक राहिलेत. त्यामुळे महाविकास आघाडी समोर हा समन्वय साधण्याचे आव्हान असेल.

समाविष्ट २३ गावांची विधानसभानिहाय विभागणी

  • १० पुरंदर - शेवाळेवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, होळकरवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, औताडेवाडी, भिलारेवाडी

  • ८ खडकवासला - खडकवासला, नांदेड, न्यू कोपरे, किरकटवाडी, कोंढवे धावडे, शिवणे, नऱ्हे, नांदोशी-सणसनगर

  • ३ भोर - सूस, बावधन, म्हाळुंगे

  • १ शिरूर - वाघोली

  • १ हडपसर - मांजरी बुद्रुक

समाविष्ट २३ गावांची लोकसभानिहाय विभागणी

  • २१ बारामती

  • २ शिरूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com