
Shiv Jayanti 2023 : शिवनेरीवर कोल्हे करणार भगव जाणीव आंदोलन; शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार...
नारायणगाव : किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज असावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी " शिवजयंती साजरी करणारच पण मुख्यमंत्री व इतरमान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार" हे भगव जाणीव आंदोलन १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त करणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले आहे.
या बाबतचा व्हिडिओ खासदार डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. खासदार डॉ. कोल्हे म्हणाले शिवजयंती निमित्त होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला मिळाली आहे. मात्र शिवजयंती निमित्त किल्ले शिवानेरीवर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर मी खासदार म्हणून बहिष्कार टाकणार आहे.
या भूमिके बाबत मी कोणाचाही निषेध अथवा विरोध करणार नाही. मात्र एक जाणीव करून देणार आहे की वारंवार मागणी करूनही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर अजूनही कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला जात नाही.
मी सन २०२१ पासून याबाबत सातत्याने मागणी करत आहे . केंद्रीय मंत्री यांच्याकडे या बाबतची मी मागणी केली होती. संसदेच्या पटलावर सुद्धा मी ही मागणी केली आहे. महामहिम राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्ताव वर सुद्धा मी ही मागणी केली आहे.
तसेच अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सुद्धा मी मागणी केली होती. मात्र वारंवार मागणी करूनही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर अजूनही कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला जात नाही. जे केंद्र सरकार ३७० कलम हटवते.
तेच केंद्र सरकार पुरातत्त्व विभागाच्या नियमात बदल करून भगवा ध्वज लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान का करू शकत नाही . असा प्रश्न खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले किल्ले शिवनेरी ही आमची अस्मिता आहे. शिवभक्तांचा गर्व आहे. या भावनेचा आदर करून राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून शिवजयंती पूर्वी किल्ले शिवनेरी येथे कायमस्वरूपी भगवा ध्वज कायमस्वरूपी लावावा अशी माझी मागणी आहे. मात्र माझ्या भूमिके बाबत ठोस पावले उचलली जात नाहीत.
माझ्या राजांच्या जन्मस्थळावर कायमस्वरूपी भगवा नाही ही जाणीव करून देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे. मात्र शिवनेरीवर तर मी जाणारच, शिवजयंती मी साजरी करणारच आहे. कारण आम्हा शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे.
किल्ल्यावर शासकीय कार्यक्रम सुरू असताना खाली पायथ्याशी सर्वसामान्य शिवभक्तांना अडवून ठेवले जाते. या शिवभक्तांसोबत मी भगवा खांद्यावर घेऊन शिवभक्तां समावेत किल्ले शिवनेरीवर जाऊन महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेणार आहे. हे भगवे आंदोलन महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी करणार आहे.