शिवप्रतिमेच्या मिरवणुका, शिवज्योतींचे स्वागत अन् पोवाड्यांचा आवाज
लोणावळा, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत लोणावळा परिसरात विविध संस्था, मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी झाली. ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात निघालेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणुका, शिवज्योतींचे स्वागत, पोवाड्यांच्या आवाजात लोणावळा परिसर शिवमय झाला होता.
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विविध गड-किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे लोणावळेकरांच्या वतीने जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत झाले. शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवभक्तांना उधाण आले होते. तुंगार्लीतील जाखमाता मंडळ, लोणावळा शहर शिवसेना, कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. भांगरवाडी, लोणावळा येथील ‘शिवजन्मोत्सव’ मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाजी चौक, तालमीचा ओटा येथे ग्रामस्थांच्या हस्ते श्री शिवप्रतिमा पूजन व ध्वजारोहण पूजा करण्यात आली. शिवजन्मोत्सव मंडळ तसेच शिवसेनेच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी ‘श्रीं’चा पालखी सोहळा व मिरवणूक काढत उत्सवात रंगत आणली. यावेळी लोणावळेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कुसगाव बुद्रूक येथील भैरवनाथ तरुण मंडळ, दत्तवाडी येथील नवनाथ मित्र मंडळ, नांगरगाव, वळवण, खंडाळा, रायवूड मित्र मंडळासह लोणावळा गावठाण, वरसोली, वाकसई, औंढे-औंढोली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोणावळा शहर, कार्ला व ग्रामीण परिसरात हिंदू समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत शहरात विविध गड-किल्ल्यांवरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांचे स्वागत करण्यात आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

