Video : शिवराई नाणं आजही खणखणीत

मारुती जैनक 
Wednesday, 19 February 2020

नोट असो की नाणं, ते चलनातून परागंदा झालं, की औषधाला मिळणंही दुरापास्त. पण, अलिकडील या स्थितीवर कडी करीत शिवराई नाणी आजही आपला खणखणीतपणा सिद्ध करताहेत. इतिहासप्रेमी छांदिष्टांच्या संग्रहात मानाचं पान मिळवीत ही नाणी शिवकालीन वैभवाचं दर्शन घडवीत आहेत.

पुणे - नोट असो की नाणं, ते चलनातून परागंदा झालं, की औषधाला मिळणंही दुरापास्त. पण, अलिकडील या स्थितीवर कडी करीत शिवराई नाणी आजही आपला खणखणीतपणा सिद्ध करताहेत. इतिहासप्रेमी छांदिष्टांच्या संग्रहात मानाचं पान मिळवीत ही नाणी शिवकालीन वैभवाचं दर्शन घडवीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्यासाठी स्वतंत्र नाण्याची निर्मिती केली. तांब्याच्या धातूपासून बनविलेली ही नाणी ‘शिवराई’ म्हणून ओळखली जातात. ही नाणी एकोणिसाव्या शतकापर्यंत चलनात होती. अर्धी, पाव, पूर्ण असे शिवराईचे मूल्य होते. याखेरीज रुका, तिरुका, सापिका, ससगणी ही नाणीही त्या काळात चलनात होती. सोन्याचा मुलामा असलेल्या होन नाण्याचीही महाराजांनी निर्मिती केली. हे नाणे राजधानी रायगडावरील खास टांकसाळीत घडविले जायचे. एका होनची किंमत साडेतीन ते चार रुपये होती. एका पुतळीची किंमत पाच रुपये, तर एक मोहोर पंधरा रुपये किमतीची होती, असा इतिहासात उल्लेख आहे.

तथापि, ही नाणी केव्हाच कालबाह्य झाली असली, तरी इतिहासप्रेमींकडून आजही त्यांना मोठी मागणी आहे. आपल्या संग्रहात या नाण्यांचा समावेश व्हावा, यासाठी छांदिष्ट मंडळी वाटेल ती किंमत मोजत आहेत. त्यातूनच या नाण्यांचे जतन व संवर्धन होत आहे. शिवकालीन नाण्यांचा संग्रह करणारे राज्य-परराज्यांत शेकडो छांदिष्ट आहेत. आपल्याकडील ठेवा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. प्रदर्शनाच्या माध्यमातून हा ठेवा लोकांपुढे मांडून ही मंडळी मराठी मनांत ऐतिहासिक पाऊलखुणा रुजवीत आहेत.

धनकवडी येथील पराग जगताप यांच्या संग्रहातदेखील शिवराई नाण्यांचा खजिना पाहायला मिळतो. त्यांच्याकडे दोनशेवर नाण्यांचा संग्रह आहे. यामध्ये शिवकालापासून पेशवाईपर्यंतच्या नाण्यांचा समावेश आहे. तंजावरच्या राजांच्या राज्यातील दुर्मीळ नाण्यांसह महाराष्ट्र सरकारने शिवरायांवर वेळोवेळी काढलेली नाणीही जगताप यांनी जतन केली आहेत. याखेरीज, शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित असलेली दुर्मीळ चित्रे, पोस्टाची तिकिटे व पाकिटांचाही ठेवा त्यांनी जपला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक इतिहास अभ्यासक व इतिहासप्रेमींनी त्यांच्या संग्रहाची प्रशंसा केली आहे.

ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह करणे हा केवळ एक छंद नाही, तर तो अभ्यास आहे. नाणेशास्त्राच्या अभ्यासाकडे जास्तीत जास्त तरुणांनी लक्ष द्यायला हवे. त्यातून पुढील पिढीला काही तरी ऐतिहासिक ठेवा उपलब्ध होऊ शकेल.
- पराग जगताप, नाणे संग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti special story