
Shiv Rajyabhishek Sohala : आषाढी वारीसाठी शिवनेरीहून शिवरायांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान
जुन्नर - पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने बुधवारी ता.३१ रोजी प्रस्थान केले.
राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या शिवरायांच्या पादुकांवर पुजारी सोपान दुराफे यांनी पवमान अभिषेक व रुद्राभिषेक केला. शिवाई देवीची महापूजा व महाद्वार पूजन झाल्यानंतर हा सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला. यावेळी श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे व ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश ताजणे उपस्थित होते.
शिवरायांच्या या पादुका नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, वढू बुद्रुक, थेऊर, वडकी मार्गे श्री शंभुराजांची जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात विसावा घेतील. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस पुरंदर गडावर शंभुराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करुन पुढे राजाभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील.
यावर्षी शिवरायांच्या राजाभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य शासनाने आयोजित केलेल्या मुख्य सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी जुन्नरमधील शिवभक्तही रायगडाकडे रवाना झाले.
पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद याप्रस म्हणाले, कोरोनाचे काळातही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना गेल्या तीनही वर्षी शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा अखंडितपणे जपलेला शिवरायांचा पालखी सोहळा ऐतिहासिक सोहळा आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने राज्याभिषेकानंतर तीन दिवस पादुका रायगडावरच विसावा घेतात व ज्येष्ठ वद्य द्वितीयेला पादुकांचे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होते. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. पालखी सोहळ्याचे यंदाचे ९ वे वर्ष तर परंपरेचे २९ वे वर्ष आहे.
यावर्षी शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी अजय शिंदे, डॉ. श्रवण अरबोळे, साहिलबुवा शेख, संकेत गायकवाड, कृष्णा भोसले, वेदांत रणसिंग यांच्या गटाला मिळाली असून स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, अभिजित शेटे, हर्षवर्धन कुऱ्हे, अक्षय कुटे, तेजस शिंदे, शिवराज संगनाळे, दुर्गेश जोशी यांनी आवश्यक व्यवस्थेसाठी सहकार्य केले.
किल्ले शिवनेरी-जुन्नर येथून आषाढी वारीसाठी शिवरायांच्या पादुकांचे प्रस्थान प्रसंगी उपस्थित शिवभक्त.jun01p01