शिवसेना ठाकरे पक्ष वार्तापत्र
शिवसेनेची ''मशाल'' संथ
दुहेरी अंकावरून शून्यावर घसरण, आत्मचिंतनाची वेळ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर ता. १६ : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय स्थित्यंतराचे मोठे पडसाद उमटले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी हा निकाल अनपेक्षित धक्का देणारा ठरला आहे. एकेकाळी महापालिकेत दुहेरी आकडा गाठून आपला दबदबा निर्माण करणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही. बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शहरात पक्षाची झालेली पीछेहाट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक दुहेरी संख्येने सभागृहात होते. मात्र, यंदा मतदारांनी नव्या समीकरणांना कौल दिला. अंतर्गत मतभेदांची किनार आणि स्थानिक पातळीवरील विस्कळित बांधणी, यामुळे पक्षाला आपला प्रभाव निर्माण करता आला नाही. प्रबळ उमेदवारी असूनही अनेक ठिकाणी ''मशाल'' मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकली नसल्याचे चित्रावरून स्पष्ट होत आहे.
पक्षाच्या या कामगिरीमागे स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि वरिष्ठ पातळीवरून सोलापूरच्या स्थानिक राजकारणाकडे झालेले दुर्लक्ष ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठोस रणनीतीचा अभाव यंदा प्रकर्षाने जाणवला. परिणामी, हक्काचे मतदारही इतर पर्यायांकडे वळल्याचे दिसून आले.
या निकालाने पक्षासमोर अस्तित्वाची आणि पुनर्बांधणीची मोठी लढाई उभी केली आहे. विखुरलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र बांधणे, पदाधिकाऱ्यांमधील संवाद वाढवणे आणि सर्वसामान्य सोलापूरकरांचा विश्वास पुन्हा संपादन करणे, हे येणाऱ्या काळात नेतृत्वापुढील सर्वात मोठे आव्हान असेल.
चौकट...
आगामी काळ महत्त्वाचा
हा पराभव म्हणजे केवळ सत्तेपासून दूर राहणे नसून, जमिनीवरची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची एक संधी म्हणून याकडे पाहणे गरजेचे आहे. आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या धक्क्यातून सावरून कशी भरारी घेतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

