पोर्तुगीजांच्या बार्देशवर स्वारी

पोर्तुगीजांच्या बार्देशवर स्वारी
Published on

लोगो ः स्वराज्याचा रणसंग्राम
अनिकेत यादव

पोर्तुगीजांच्या बार्देसवर स्वारी

आग्र्याहून परतल्यानंतर एप्रिल १६६७मध्ये राजांनी दक्षिण कोकणावर धडक मारली आणि कुडाळ, पेडणे, भतग्राम, सत्तरी, फोंडे इत्यादी प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. तेथील आदिलशाही सैन्य व कोकणातील देसाई यांना हुसकावल्यानंतर त्यांना सहकार्य करणाऱ्या पोर्तुगीजांवर राजांनी आपली नजर वळविली. यातूनच १६६७ आणि १६७० असे दोन पोर्तुगीजांसोबतचे ऐतिहासिक तह आकारास आले.

पोर्तुगीज संबंधाची पार्श्‍वभूमी ः भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवणारे (मे १४९८) आणि सर्वांत शेवटी जाणारे (डिसेंबर १९६१) युरोपियन व्यापारी म्हणजे ‘पोर्तुगीज’. अशी ४६३ वर्षांची त्यांची भारतातील प्रदिर्घ कारकीर्द. व्यापारवृद्धी, राज्यविस्तार आणि धर्मप्रसार या ३ प्रमुख उद्दिष्टांसाठी पोर्तुगीजांनी जगभर आपले साम्राज्य वाढविले. १५१० पासून गोवे बेट ही त्यांच्या पौर्वात्य साम्राज्याची राजधानी बनली. भारताच्या संपूर्ण समुद्रकिनारपट्टीलगत त्यांच्या ५० हून अधिक वसाहती/लष्करी ठाणी होत्या. भारताच्या समुद्रावर प्रभुत्व असल्यामुळे पोर्तुगालचा राजा स्वतःला ‘हिंदी महासागराचा सम्राट’ म्हणवून घेत असे. पोर्तुगीजांचे परवाने (कार्ताझ्) असल्याशिवाय कोणालाही हिंदी महासागरात संचार करता येत नसे.
निजामशाहीत असल्यापासून (साधारण १६३४ पासून) शाहजीराजांचे पोर्तुगीजांशी मैत्रीचे संबंध होते. शाहजीराजांनी १२ ऑगस्ट १६५४ रोजी गोव्यावर स्वारी केली. नोव्हेंबर १६५७मध्ये शिवाजीराजांनी पोर्तुगीजांच्या कोरलई जवळचे (वरचे) चौल जिंकले आणि तेव्हापासून त्यांच्या राजकीय संबंधांची सुरुवात झाली. काही पोर्तुगीज कारागीर मदतीला घेऊन राजांनी आपल्या नौकाबांधणीची सुरुवात केली. त्यानंतर समुद्री व्यापाराचे महत्त्व लक्षात घेऊन राजांनी बंदरे, समुद्री किल्ले व सागरी व्यापार याकडे देखील लक्ष दिले. शिवाजीराजांनी जेव्हा जेव्हा (१६६३ व १६६४) दक्षिण कोकणावर आपला अंमल प्रस्थापित केला, तेव्हा तेव्हा वाडीचे सावंत तसेच पेडणे व कुडाळ येथील देसाई हे पोर्तुगीजांच्या आश्रयास गोव्याला जात. आणि संधी मिळताच शिवाजीराजांच्या प्रदेशावर छापे घालत. त्यामुळे या दोन सत्तांमध्ये केव्हा ना केव्हा भडका उडणारच होता.

देसायांचे पलायन व राजांचे आक्रमण ः फेब्रुवारी ते सप्टेंबर १६६७ या काळात शिवसैन्याने गोवे बेट सोडून पेडणे, भतग्राम, सत्तरी, फोंडे व दक्षिण कोकणाचा प्रदेश जिंकून घेतला. मात्र फेब्रुवारी १६६७मध्ये पेडणेचा देसाई केशव नाईक याने राजांच्या प्रदेशावर छुपे हल्ले केले. तसेच सप्टेंबर १६६७मध्ये लखम सावंतांचा पुतण्या नारबा सावंत याने वेंगुर्ला येथे छापे घालून लूटमार केली. हे कळताच राजांनी त्यांच्या मागावर आपले काही सैन्य पाठविले, तेव्हा हे देसाई पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले. देसायांच्या या सततच्या कुरघोड्या कायमच्या मोडून काढण्यासाठी राजांनी पोर्तुगीजांच्या गोवे बेटालगतच्या बार्देस प्रांतावर आक्रमण करण्याचे ठरविले. याचा सुगावा लागताच पोर्तुगीज व्हाईसरॉय कोंदी द सांव्हिसेंती याने १५ नोव्हेंबर १६६७ रोजी थीवीम (थिये) व शापोरा (कांयसूंव) येथील किल्लेदार; गोव्यात आश्रय घेतलेले देसाई; रेवाडे व नानोडे येथील राणे तसेच पोर्तुगीजांचा आरमार प्रमुख फेर्नाव व्हाज द सिकैर या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

पोर्तुगीजांचे अत्याचार ः अखेर १९/२० नोव्हेंबर १६६७ च्या रात्री, शिवाजीराजांनी १ हजार घोडेस्वार व ५ हजार पायदळासह बार्देसावर धडक मारली. राजांची ही मोहीम केवळ पोर्तुगीजांवर दबाव निर्माण व्हावा या उद्देशाने केलेली होती. मात्र येथे आल्यानंतर पोर्तुगीज अधिकारी व धर्मगुरू (पाद्री) येथील प्रजेवर करत असलेल्या धार्मिक अत्याचाराच्या तक्रारी राजांना कळाल्या. (अधिक माहितीसाठी पहा- गोवा इन्क्वीझिशन, लेखक अ. का. प्रियोळकर) याच वेळी कोळवाल येथील दोन पाद्री शिवसैन्याविरुद्ध चाल करून आले असता त्यांना ठार केले. हे पाद्री अनेकदा हाती शस्त्र घेऊन युद्धात सहभागी होत, किंबहुना सैन्याचा शस्त्रसाठा अनेकदा त्यांच्याच ताब्यात असे. राजांच्या या आक्रमक कारवाईमुळे पोर्तुगीज लोक रईस मागोस व आग्वाद येथील किल्ल्यांकडे पळून गेले. दरम्यान २० ते २२ नोव्हेंबर या ३ दिवसांत शिवसैन्याने बार्देसातील काही गावे ताब्यात घेतली. येथील जनतेस उद्देशून राजांनी काही पत्रके वाटली आणि त्यानुसार कित्येक जणांनी त्याप्रमाणे वर्तणूक देखील केली. या काळात शत्रूवर दहशत निर्माण होण्यासाठी शिवाजीराजे स्वतः येथे थांबले. २२ नोव्हेंबर रोजी ८४ सैनिक घेऊन पोर्तुगीज व्हाईसरॉय स्वतः लढण्यासाठी बार्देसात आला. मात्र इतक्या कमी संख्येने आलेल्या व्हाईसरॉयला रणांगणातून लांछनास्पदरित्या पळ काढावा लागला. २२ नोव्हेंबर रोजी १३०० जणांना कैदी म्हणून सोबत घेऊन शिवाजीराजे डिचोली येथे आले.

प्रत्यक्ष तह ः राजांना पोर्तुगीजांशी विनाकारण युद्ध वाढवायचे नव्हते, तर देसायांना मिळणारा आश्रय तोडायचा होता. त्यामुळे त्यांनी लागलीच सकोपंत या आपल्या दूताला तहाच्या बोलणीसाठी पाठवले, तर पोर्तुगीजांनी रामोजी शेणवी कोठारी याला राजांकडे धाडले. ५ डिसेंबरपर्यंत दूतांची आणि पत्रांची देवाणघेवाण होऊन अखेरीस तह पूर्णत्वास आला. त्यावर पोर्तुगीज विजरईने आपली स्वाक्षरी ५ डिसेंबर रोजी तर ११ डिसेंबर १६६७ रोजी शिवाजीराजांनी आपला शिक्कामोर्तब केला.

तहाचा परिणाम ः उभयतांमध्ये तह झाल्यानंतर त्याच्या पूर्ततेसाठी पोर्तुगीज राजदूत, रेव्हरंड गोन्सालो मार्टिन्स हा राजांच्या भेटीसाठी रायगड येथे गेला. शिवसैन्याने पकडून नेलेल्या पोर्तुगीज कैद्यांचा ताबा त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पोर्तुगीजांनी बंडखोरांना आश्रय देऊ नये हा तहाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे १७ डिसेंबर १६६७ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने कुडाळचे लखम सावंत व नार (नारबा) सावंत; पेडणे येथील केशव नाईक; भतग्राम/डिचोलीचे मल शेणवी इत्यादी देसायांना आवश्यक ते आदेश दिले. तरीही लखम सावंत व केशव नाईक यांनी राजांविरुद्ध पुन्हा कागाळ्या केल्यामुळे, जून १६६८ मध्ये त्यांना गोव्यातून हाकलून देण्यात आले. अखेरीस या देसायांनी राजांकडे क्षमायाचना केली आणि ती राजांनी मान्य केली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत या देसायांनी उठाव केल्याची मोठी घटना आढळत नाही.

दाभोळ येथे पोर्तुगीज वखारीस मान्यता ः पोर्तुगीज दूत रायगडावर असताना, राजांनी त्यांना दाभोळ येथे वखार (व्यापारी केंद्र) स्थापन करण्यास परवानगी दिली. यापूर्वी दाभोळ येथे आदिलशाहीची सत्ता असताना पोर्तुगीजांची वखार होती, मात्र ती बंद पडली होती. राजांनी परवानगी दिल्यानंतर जुलै १६६८च्या सुमारास पोर्तुगीजांनी तिथे एका अधिकाऱ्याची (फैतोर) देखील नेमणूक केली. मात्र ही वखार लवकरच बंद करण्यात आली असावी. फ्रेंचांनी मात्र डिसेंबर १६६८च्या सुमारास राजांच्या परवानगीने ‘राजापूर’ येथे वखारीची स्थापना केली.

कारस्थानी पोर्तुगीज ः वरकरणी पोर्तुगीजांनी राजांशी तह केला असला तरीही आपले कारस्थान मात्र थांबवले नव्हते. उभयतांमध्ये तह झाल्यानंतर अवघ्या पाचच महिन्यांत १८ मे १६६८ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा शिवाजीराजांविरुद्ध मुघलांना नौदलाचे सहकार्य देऊ केले. (शिवचरित्रप्रदिप, इंग्लिश विभाग,पृ.१०)

श्रीसप्तकोटेश्‍वराचा जीर्णोद्धार ः १३ नोव्हेंबर १६६८च्या दरम्यान शिवाजीराजांनी नार्वे येथे श्रीसप्तकोटेश्‍वर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. मूळच्या बाराव्या शतकातील कदंब राजवटीतील हे मंदिर इस्लामी आक्रमकांमुळे मूळ स्थानावरून हलविले होते. नवीन ठिकाणी हलविलेले मंदिरही १५४०मध्ये पोर्तुगीजांनी नष्ट केल्यामुळे त्याची पुनर्स्थापना नार्वे येथे करण्यात आली होती. अशा प्रकारे दोन वेळा स्थलांतरित झालेले हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे त्याची पुर्नबांधणी शिवाजीराजांनी केली.

गोव्यावर स्वारीची अफवा ः ऑक्टोबर १६६८मध्ये ४०० ते ५०० शिवसैन्य गोव्यात विविध ठिकाणी लपून बसल्याचा पोर्तुगीज गव्हर्नरला सुगावा लागला. संतापलेल्या गव्हर्नरने राजांच्या दूताला बोलावून त्याची मानहानी करत त्याला सौम्य शिक्षा केली. याचा सडेतोड जाब विचारण्यासाठी राजांनी १ हजार घोडेस्वार व ८ हजार पायदळ घेऊन गोवे बेटावर स्वारी करणार असल्याची घोषणा केली, मात्र ती होऊ शकली नाही. (१२ नोव्हेंबर १६६८चे इंग्रजांचे पत्र).

सिद्दी पोर्तुगीजांचा मांडलिक ः दंडा-राजपुरीचा सिद्दी हा १६६७च्या पूर्वी आदिलशाहीचा नाममात्र अधिकारी होता. त्याने १६६७मध्ये पोर्तुगीजांचे अधिपत्य स्वीकारले. एप्रिल १६६९ च्या सुमारास राजांनी जमिनीवरून व समुद्रावरून अशा दोन्ही मार्गांनी सिद्दीविरुद्ध लष्करी मोहिमा सुरू केल्या. हे कळताच पोर्तुगीजांनी २८ मे १६६९ रोजी सिद्दीला शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश काढले. पुढे २१ ऑगस्ट १६६९ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने चौल येथील पोर्तुगीज अधिकाऱ्याला पुढील निर्देश दिले ः ‘शिवाजीराजांनी आपल्या नौदलासह सिद्दीच्या जंजिऱ्याला वेढा घातला, तर तुम्ही आमच्या वतीने राजांच्या सरदाराला किंवा खुद्द राजांना असे कळवा की, समुद्र हा आमचा आहे आणि सिद्दी हा आमचा मांडलिक आहे; अशा परिस्थितीत, जंजिऱ्याला वेढा घालून आमच्या सागरी सुरक्षेमध्ये अडथळा निर्माण करू नये; आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर समुद्राची व सिद्दीची सुरक्षा करण्यासाठी आमची सर्व साधने पणाला लावणे हे आमचे कर्तव्य असेल.’ (पोर्तुगीज अँड द मराठाज्, डॉ. पिसुर्लेकर, पृ.३१, तळटीप क्र. ७४)
तरीही शिवसैनिकांनी चहुबाजूंनी सिद्दीची अशी कोंडी केली की, तो अन्नावाचून हतबल झाला आणि त्याने इंग्रज व मुघलांकडे मदतीची याचना केली. संधी साधून इंग्रज आणि पोर्तुगीज दोघेही जंजिरा हडपण्याची खटपट करू लागले, परंतु दोघांचीही शिवाजीराजांशी उघड वैर घेण्याची तयारी नव्हती. १६६९चा संपूर्ण पावसाळाभर हा वेढा चालला. जंजिऱ्यावरील ५७२ तोफांमुळे थेट हल्ला करून किल्ला जिंकता येत नव्हता, तरीही शिवसैन्याने प्रखर वेढा देऊन सिद्दीला जेरीस आणले होते. सिद्दीने देखील शेवटच्या श्‍वासापर्यंत किल्ला लढवण्याचा निर्धार केला होता आणि शेवट कोणताही पर्याय न उरल्यास तो किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्याचा सिद्दीचा विचार होता. मात्र काही कारणास्तव शिवसैन्यास हा वेढा उठवावा लागला.

नाविक युद्ध व १६७०चा तह ः पोर्तुगीजांनी सिद्दीला उघडउघड सहकार्य केल्यामुळे शिवाजीराजांच्या व पोर्तुगीजांच्या नौदलांमध्ये युद्धाचा भडका उडाला. ऑक्टोबर १६६९च्या सुमारास शिवाजीराजांच्या नौदलाने पोर्तुगीजांची काही जहाजे जप्त केली तर पोर्तुगीजांनी देखील त्यांचे एक जहाज पकडले. यावेळी राजांचे राखीव सैन्य पेण येथे होते तसेच स्वतः राजे देखील ससैन्य कोकणात उपस्थित होते. त्यांमुळे दोन्ही सैन्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी, संघर्ष वाढू न देता राजांनी विठ्ठल पंडित या दूताला सलोख्याच्या बोलणीसाठी गोव्याला पाठविले. त्यानंतर उभयतांमध्ये चर्चेेच्या काही फेऱ्या पार पडल्या. याच दरम्यान मस्कतच्या इमामाचे व पोर्तुगीजांचे युद्ध सुरू असल्याची गुप्त माहिती राजांनी हेरांकरवी मिळवली होती. मस्कतच्या इमामाची भीती दाखवून राजांनी पोर्तुगीजांना असा काही गर्भित इशारा दिला की, त्यामुळे पोर्तुगीज चांगलेच वरमले. अखेर फेब्रुवारी १६७०मध्ये उभयतांमध्ये पुन्हा तह करण्यात आला. यावर पोर्तुगीज गव्हर्नर अँतोनियो द मेलो द कॅस्त्रो व मॅन्युएल कोर्टे रिअल द सॅम्पायो यांच्या सह्या आणि शिवाजीराजांचा शिक्का उमटविण्यात आला. या तहाद्वारे, सीमेवरील लष्करी ठाण्यांभोवती तटबंदी उभारण्यास पोर्तुगीजांनी राजांना परवानगी दिली. पोर्तुगीजांनी सिद्दीला कोणतीही मदत न करण्याचे वचन दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, राजांच्या केवळ लहान नौकांना पोर्तुगीजांच्या परवान्याशिवाय (कार्ताझ्) समुद्रावर संचार करण्याची परवानगी मिळाली. ही पोर्तुगीजांच्या हिंदी महासागरावरील एकाधिकारशाहीला राजांनी पाडलेले छोटेसे छिद्रच होते. (मुख्य संदर्भ ः पोर्तुगेज-मराठे संबंध, डॉ. पिसुर्लेकर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com