
Pune News : मद्यपींवर आता राहणार पोलिसांची करडी नजर
शिवाजीनगर - मद्यपान करून रात्री-अपरात्री एकमेकांना मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे, महिलांना अश्लिल बोलणे, सार्वजनिक ठिकाणी गांजा, सिगारेट ओढणे आता टवाळखोरांना महागात पडणार आहे. दिवसातून तीन वेळा पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घातली जाणार असून टवाळखोरांवर पोलिसांकडून कडक कारवाई करणार असल्याचे चतुःश्रुंगी पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोखलेनगर येथील हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदानावर तसेच वीर बाजीप्रभू शाळा या रस्त्यावर मद्यापींनी उच्छाद मांडला, या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी 'सकाळ' कडे मद्यापींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. याची दखल घेऊन 'सकाळ' ने 'हुतात्मा ओंबळे मैदान बनले मद्यापींचा अड्डा!' असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. वृत्ताची तात्काळ दखल घेऊन चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त रवी खंदारे, आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी संबंधित ठिकाणाची पाहणी करून उपायोजना करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले. ओंबळे मैदानाच्या आवारात महापालिकेची खोली होती, त्या खोलीचा ताबा मद्यापींनी घेतला होता. संबंधित खोली यापुढे आरोग्य कोठी म्हणून वापरली जाणार आहे.
मद्यापींना पाणी, ग्लास, खाद्य पुरवणाऱ्या अनाधिकृत हातगाडीवर अतिक्रमण विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा पदपथावर अनाधिकृत हातगाड्या लागल्या जात आहेत . यासह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारच हातगाड्या उभा केल्या जात असल्याने मैदानात जाणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागते. यावेळी पाहणी करताना रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, आदित्य माळवे, सतीश बहिरट, राम म्हेत्रे, अपर्णा कुऱ्हाडे, विनोद धोत्रे, प्रशांत लाटे, ख़ुशी लाटे, सुजित गोटेकर, केतन जोशी, रमेश भंडारी, राजेश धोत्रे आदी उपस्थित होते.
'यापुढे डीबी पोलिस व बीट मार्शल दिवसातून तीन वेळा पेट्रोलिंग करतील. उघड्यावर मद्यपान करणारे तसेच दहशत पसरवणारे यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.'
- बालाजी पांढरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रुंगी ठाणे.
'महापालिकेच्या खोलीत मद्यपान करतात अशी मला माहिती मिळाली. संबंधित खोली ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आरोग्य कोठी सुरू करत आहोत.'
- शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्याल, सहायक आयुक्त रवी खंदारे