Pune : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी घेतले उपोषण मागे  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी घेतले उपोषण मागे 

औंध : राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी व निमसरकारी सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी सात दिवस चाललेले उपोषण अखेर आज क्रिडा आयुक्तांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी आपल्या मागणीवर ठाम राहत सात दिवस उपोषण सुरु ठेवले होते.

५ टक्के क्रिडा आरक्षणामधील २ टक्के आरक्षण हे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना देण्यात यावे अशीही मागणी या खेळाडूंची होती.राज्यात जवळपास १०४ खेळाडू नियुक्तीसाठी झगडत असून सरकारी व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याने शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबवण्यात आला होता. खेळाडूंच्या उपोषणाची दखल घेत क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मागण्यांसंदर्भात क्रिडा मंत्रालयाकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज सकाळी उपोषणकर्त्या खेळाडूंनी उपोषण मागे घेतले.

उपोषणकर्ते खेळाडू विकास काळे,सागर गुल्हाने,लौकीक फुलकर,नेहा ढेपे या खेळाडूंचा सहभाग होता.याप्रसंगी क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह क्रिडा. उपसंचालक सुहास पाटील,महाराष्ट्र क्रिडा असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगांवकर, शारिरीक शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ पाटोळे, शालेय खेल बचाव समितीचे अध्यक्ष शाम भोसले, सचिव शिवाजी भोसले, पुणे शहर शारिरीक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष संजय मोतलींग इत्यादी उपस्थित होते.या उपोषणाला शारिरीक शिक्षण समन्वय समिती, शालेय खेल बचाव समिती,राजपूत करणी सेना, जयहिंद स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी, जय गजानन महाराज क्रिडा मंडळ,नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह खासदार गिरीश बापट यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला होता.

खेळाडूंच्या नियुक्तीच्या संदर्भात अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालय पातळीवर बैठक होणार असून त्यानंतर या खेळाडूंना सेवेत कशाप्रकारे सामावून घ्यायचे याविषयीचा निर्णय घेतला जाईल....

ओमप्रकाश बकोरिया,क्रिडा आयुक्त

loading image
go to top