

शिवेंद्रसिंहराजेंचा बालेकिल्ला मजबूत
जावळी सोसायटीमध्ये ज्ञानदेव रांजणेंचा एकतर्फी विजय
कास, ता. ३ ः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे कट्टर समर्थक व माजी संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना एक मताने पराभूत करून राज्यभर चर्चेत आलेले ज्ञानदेव रांजणे यांना यावर्षी तुलनेने निवडणूक सोपी होती. शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणाहून माघार घेत त्यांचे समर्थक विठ्ठल गोळे यांना मैदानात उतरवले. त्याचवेळी श्री. रांजणेंचा विजय निश्चित झाला होता. ४८ मतांपैकी तब्बल ३८ मते घेऊन श्री. रांजणे यांनी मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले. श्री. गोळे यांना आठ मते तसेच त्यांच्या गटाचे एक मत ओळखपत्रातील अडचणीमुळे होऊ शकले नाही. शशिकांत शिंदे मतदानासाठी हजर न राहिल्याने दोन मते त्यांना मिळू शकली नाहीत. ४८ पैकी ४६ मतदारांनी मतदान केले. तब्बल ३८ मते घेत रांजणेंनी जिल्हा परिषद निवडणुकीतील पत्नीच्या पराभवाचा वचपा काढला.
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर ठराव प्रक्रियेवेळी जावळी तालुक्यात शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांत जोरदार राडा पाहायला मिळाला. संचालक पळवापळवी, ठरावावेळी गुद्दागुद्दी असे प्रकार घडल्याने निवडणुकीपूर्वीच कमालीचा तणाव व चुरस पाहायला मिळाली; परंतु मंत्री शिवेंद्रसिंहराजे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी ठराव प्रक्रियेत लक्ष घालून जास्तीतजास्त ठराव आपल्या बाजूने करून घेतले. झालेल्या ठरावधारकांना तत्काळ अडीच महिन्यांपासून सुरक्षितस्थळी सहलीला पाठवले. त्यामुळे शशिकांत शिंदे व त्यांच्या समर्थकांना राजकीय डावपेच खेळण्यास वाव ठेवला नाही. शशिकांत शिंदे यांनी येथून भरलेला अर्ज माघारी घेत निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याच्या इराद्याने समर्थक विठ्ठल गोळे यांना मैदानात उतरवले. या विजयाने जिल्हा परिषदेतील पराभवातून बॅकफुटला गेलेले श्री. रांजणे पुन्हा प्रकाशझोतात येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळाला.
.............
चौकट
..............
अजून संपलेलो नाही...
जिल्हा परिषद निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा झालेल्या पराभवामुळे रांजणे जावळीच्या राजकारणातून थोडे बाजूला पडले होते; परंतु जिल्हा बँकेत निवडून येत त्यांनी ‘राजकारणातून अजून संपलेलो नाही’ हे दाखवून देत विजयाचा गुलाल उधळला आहे.
.........................
‘जावळीचा स्वाभिमान’
शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यापासून शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाबरोबर त्यांचे खटके उडत आहेत. ‘जावळीचा स्वाभिमान’ या नावाखाली दोन्ही गटांकडून भावनिक राजकारण खेळले जात आहे. आगामी काळात शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी ताकदीने मैदानात उतरावे लागेल, तरच यश मिळू शकते, हे या निकालाने सिद्ध झाले. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीवरील पकड मजबूत असल्याचे निकालातून दाखवून दिले आहे.
मेढा ः निकालानंतर ज्ञानदेव रांजणे यांची निघालेली विजयी रॅली. (अर्चना पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.