जुन्नर - श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर बुधवारी (ता. १९) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीगणाच्या उपस्थितीत शासकीय शिवजयंती सोहळा होणार आहे.
आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी शिवनेरीवरील शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार आहे. शिवजन्मस्थानी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा, पाळणा, शासकीय मानवंदना, लेझीम पथक साहसी खेळ होतील. त्यानंतर अभिवादन सभा होईल. शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा प्रदान होतील.
दुपारी शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर मर्दानी व साहसी खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर सायंकाळी शिवरायांची महाआरती होईल. जुन्नर शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होईल. रात्री गायिका वैशाली सावंत यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
शिवजयंतीनिमित्त महिला बचत गटाचे वस्तू व खाद्य पदार्थांचे विक्रीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तसेच, कबड्डी स्पर्धा व बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. शिवसह्याद्री आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक महानाट्य कार्यक्रम आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असून, चांदीची गदा व शिवनेरी केसरी या किताबाने विजयी स्पर्धकास सन्मानित करण्यात येणार आहे.
‘गौरव महाराष्ट्राचा मराठमोळा’ कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. १८) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर गारद देऊन महाआरती, तसेच फायर शो आयोजित केला आहे, असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.
दांगट, पायमोडे, कोरडे, डुंबरे ‘शिवनेरी भूषण’चे मानकरी
यंदाचा ‘शिवनेरी भूषण पुरस्कार’ जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्यासह राजाभाऊ पायमोडे, जालिंदर कोरडे व डॉ. अमोल डुंबरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यात मराठा सेवा संघ आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्र्याचे व मान्यवरांचे स्वागत, तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवनेरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी आपल्या १९९४ ते २००४ या आमदारकीच्या काळात तालुक्याच्या उत्कर्षासाठी विशेष उल्लेखनीय योगदान दिले आहे. डॉ. अमोल डुंबरे यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल पुणे, तसेच आळेफाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे कॅन्सर सर्जन केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
आठ हजार वृक्षांचे संगोपन करणारे जालिंदर कोरडे यांनी पर्यावरण वाढीसाठी वृक्ष लागवड व वृक्ष जोपासनेचे काम केले आहे. त्यांना राज्य शासनाने देखील कार्यासाठी सन्मानित केलेले आहे. आरोग्य दूत राजाभाऊ पायमोडे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुणे शहरात आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत,नि राधारांना मोफत जेवण औषधासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.