शिवनेरीची ‘शिवसुमन’ आता रायगडावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

 शिवजन्माने पुनित झालेल्या शिवनेरीवर सर्वप्रथम आढळलेल्या भगव्या-लालसर रंगाच्या आणि सुदर्शन चक्राप्रमाणे आकार असलेल्या फुलाचे शिवसुमन नामकरण केल्यानंतर आता शिवरायांच्या रायगड या कर्मभूमीवर या फुलाची रोपे लावण्यात आली आहेत.

पुणे - शिवजन्माने पुनित झालेल्या शिवनेरीवर सर्वप्रथम आढळलेल्या भगव्या-लालसर रंगाच्या आणि सुदर्शन चक्राप्रमाणे आकार असलेल्या फुलाचे शिवसुमन नामकरण केल्यानंतर आता शिवरायांच्या रायगड या कर्मभूमीवर या फुलाची रोपे लावण्यात आली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगाच्या पाठीवर केवळ सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये आढळून येणाऱ्या ‘फ्रेरिया इंडिका’ या वनस्पतीचे नामकरण करण्याचा कार्यक्रम रायगडावर झाला आणि त्यानंतर त्या  शिवतीर्थावर पन्नास रोपेही लावण्यात आली.

बायोस्फिअर्स, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, विविध संस्था आणि शिवप्रेमींनी एकत्र येऊन नामकरणाचा हा सोहळा केला. या वनस्पतीचा आढळ सह्याद्री पर्वतरांगांतील गडकिल्ल्यांवरच आहे. त्यामुळे या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे, अशी पर्यावरणप्रेमी, शिवप्रेमींची इच्छा होती. 

‘शिवसुमन’ची पहिल्यांदा शास्त्रीय नोंद डालझेल या शास्त्रज्ञाने शिवनेरीवर केली होती. ही वनस्पती अतिसंकटग्रस्त असून, जगभरात केवळ महाराष्ट्रातच आढळते. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगामधील तीव्र डोंगर - उतार आणि कड्यांवरच ती उगवते. स्थानिक भाषेत तिला ‘शिंदळ माकुडी’ नावाने ओळखले जाते. पुणे जिल्ह्याचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह फुल म्हणूनही ही वनस्पती ज्ञात आहे. 

भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि आय.यू.सी.एन. या नामांकित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार जगातील अतिदुर्मीळ वनस्पतींच्या यादीत तिचा समावेश आहे. या अलौकिक फुलाचे पर्यावरणीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या वनस्पतीचा संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतल्याचे डॉ. पुणेकर यांनी सांगितले. 

या वनस्पतीचे रोपण स्वराज्यातील विविध गडकोटांवर व छत्रपती शिवरायांशी निगडित असलेल्या स्थानांवर केले जाईल. तसेच येणाऱ्या काळात तिचे टपाल तिकीटदेखील करण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivneri Shivsuman now on Raigad