Eknath Shinde : रायगडप्रमाणे शिवनेरीचा विकास करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वराज्याची राजधानी रायगड प्रमाणे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचा विकास करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजीत अभिवादन सभेत बोलताना दिले.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

जुन्नर : स्वराज्याची राजधानी रायगड प्रमाणे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचा विकास करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजीत अभिवादन सभेत बोलताना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार अमोल कोल्हे,आमदार अतुल बेनके, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार शरद सोनवणे,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी,जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके,विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,उपवनसंरक्षक अमोल सातपुते,मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,जुन्नर परिसरात बिबट सफारी साकार करून,पर्यटनस्थळ,तीर्थक्षेत्रे शिवजन्मभूमीला जोडण्यासाठी प्रयत्नशील राहू. शिवरायांनी स्वराज्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापीत केली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम,शौर्य,त्याग,समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते.त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष,युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते.अठरापगड जातीचे,धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले.प्रजेचे कल्याण व दुःखापुढे स्वतःचे दुःख,आराम कवडीमोल मानला.त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो.शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,किल्ल्यांच्या विकासाकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असून पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे ही पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्यात निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार,चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही. शिवाजी महाराजांचा एकतेचा तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार नव्या पिढीला कळण्यासाठी या जयंती निमित्त निर्धार करु या.

यावेळी वन विभागाने किल्ले शिवनेरीवर साकारलेल्या मानव निर्मित शिवाई देवराई वनाचे अनावरण करण्यात आले. प्रास्तविक मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्यध्यक्ष विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी वनराईची कल्पना शिवनेरीवरील विकास कामांची माहिती दिली.मराठा सेवा संघाचे कैलास मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष गणेश महाबरे यांनी आभार मानले.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

जुन्नर,खेड आंबेगाव तीन तालुक्यातनिसर्ग चक्रीवादळामुळे आदिवासींच्या हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तसेच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहनही केले.

साबळे,भुजबळ व काकडे यांना पुरस्कार

जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र पोलिस महासंचालक डॉ. दिलीप किसन भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार तसेच कारगील युद्धात कामगीरी बजावलेले माजी ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे आणि अंटार्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले शास्त्रज्ञ डॉ. अरूण रामचंद्र साबळे यांना शिवनेर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com