शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी

तब्बल ३२ देशांतील मराठीभाषकांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात कोल्हापुरातून  प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती महाराज आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सहभागी झाले होते.   

शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी

पुणे - न्यूयॉर्कमधील अल्बनी ढोल-ताशा पथकाच्या पुढाकारातून आणि जगभरातील मराठीजनांच्या सहभागातून ऑनलाइन आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तब्बल ३२ देशांतील मराठीभाषकांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात कोल्हापुरातून प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती महाराज आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सहभागी झाले होते. 

सोहळ्याचे उद्‌घाटन करताना शाहू महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवरायांचा गौरवशाली देदीप्यमान इतिहास कथन केला. या वेळी अल्बनी ढोल-ताशा पथकाच्या वेबसाइटचे आणि लोगोचे शाहू महाराजांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण करण्यात आले. न्यूयॉर्कस्थित कल्याण घुले यांच्या पथकाने कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आणि संयोजन केले. या प्रसंगी अमेरिकेतील उद्योजक मनोज शिंदे, किशोर गोरे यांच्यासह अल्बनी ढोल-ताशा पथक, संकल्प मराठी मंडळ, ग्लोबल नगरी, छत्रपती फाउंडेशन, जल्लोष ढोल-ताशा पथकातील पदाधिकारी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

रायगडावरील कुटुंबांना मदत
शिवराज्याभिषेक जिथे झाला, अशा दुर्गराज रायगडावर लॉकडाउनमुळे पर्यटन बंद आहे. पर्यायाने तेथील छोटे व्यवसाय करणारी कुटुंबे अडचणीत असल्याचे विराज तावरे यांच्याकडून समजले. अशा २०० कुटुंबांना एक महिन्याचा शिधा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडे सुपूर्त केल्याची माहिती कल्याण घुले यांनी दिली. अमेरिकेतील मराठी बांधवांची ही मदत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संबंधित कुटुंबांना रायगडावर सुपूर्त करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परदेशात असला तरी मराठी माणूस रायगडाला विसरलेला नाही. प्रथमच ऑनलाइन माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जगभरातील मराठीजनांची स्पंदने जोडली गेली आहेत. असा उपक्रम इथून पुढे प्रत्येक शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक दिनाला आम्ही करणार आहोत.
- कल्याण घुले, संस्थापक अध्यक्ष, अल्बनी ढोल-ताशा पथक, न्यूयॉर्क

loading image
go to top