शिवसैनिकांनी ग्रामपंचायती व सहकारी क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करावे : आढळराव पाटील

डी. के. वळसे-पाटील
Sunday, 1 November 2020

शिवसैनिकांनी गावपातळीवरील राजकारणात लक्ष देऊन सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करावे.”असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

मंचर : “राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा जीव सहकारात आहे. त्यावरच राष्ट्रवादी पक्ष वाढला आहे. सहकाराची खरी ओळख असलेल्या ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकांवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. वर्षांनुवर्षे तीच तीच लोकं सोसायट्या व सहकारी संस्थांवर ठाण मांडून बसली आहेत. बाजार समिती, जिल्हा बँक हा राष्ट्रवादीचा पाया आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावपातळीवरील राजकारणात लक्ष देऊन सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करावे.”असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

एकलहरे (ता. आंबेगाव) येथे इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभाग्रहात  आंबेगाव तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, देविदास दरेकर, अरुण गिरे, सचिन बांगर, सुनिल बाणखेले, राजाराम बाणखेले, श्रध्दा कदम, शिवाजी राजगुरू, सागर काजळे, विजय आढारी, संतोष डोके, दिलीप पवळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, ''शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा बैठक घेऊन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची मते व समस्या जाणून घेण्याचे काम करीत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी शिवासिनिकांनी लक्ष द्यावे. प्रस्थापितांची राजकारणातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपापल्या गावात शिवसेना पक्ष संघटना वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करावे.'' 

कटके म्हणाले” मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे काम करणाऱ्या तरुणांना संधी दिली जाईल. पदाधिकार्यांनी शिवसेना वाढीसाठी काम करावे.

कोरोना काळात शिवसेना पक्ष व भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून किराणा किट व अत्यावश्यक साहित्याचे जिल्हाभर वाटप सामान्यांना केले आहे. निसर्ग चक्रीवादळातही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत नुकसानीच्या पंचनामे तात्काळ करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. हा अहवाल पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने दहा हजार कोटींची मदत जाहीर केली. पण जिल्ह्यात शिवसेनेला टाळून मुख्यमंत्र्यांचा साधा फोटोही न टाकता ही मदत फक्त आणि फक्त राष्ट्रवादीने केली असा चुकीचा प्रचार राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींकडून सध्या सुरु आहे. जिल्ह्यातील महत्वाची कामे मुख्यमंत्र्यांकडून प्राधान्याने मार्गी लागणार आहेत-शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे उपनेते, शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsainiks should dominate Gram Panchayats and co-operative sector in the district says adhalrao patil