पुणे : चंद्रकांत पाटील यांना व्यक्तीद्वेषाची कावीळ; शिवसेनेची टीका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

- मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तीद्वेषाची कावीळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना झाल्याने ते रोज उठून काही तरी बरळत आहेत. पाटील यांना एकर, हेक्‍टर यांच्यातील कळते. त्यामुळे आरक्षणे उठवणे आणि भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम त्यांनी महसूलमंत्री असताना केले. त्यांच्या या निर्णयांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे यांना एकर, हेक्‍टरमधला फरक कळत नाही. साखर, महसूल यातील समजत नसल्याने ते मंत्र्यांकडे बघतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याला आज शिवसेनेने उत्तर दिले. 

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांना चौरस फूट, मीटर यातील कळते म्हणूनच बालेवाडी येथील सर्वे क्रमांक 17 मधील खेळाच्या मैदानात बिल्डरच्या जागेची मोजणी करून घेतली. हॅपी कॉलनीतील सर्वे क्रमांक 67, 68, कोथरूड येथील सर्वे क्रमांक 30; तर बाणेर येथील सर्वे क्रमांक 35 मधील आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतला. पर्वती येथील सर्वे क्रमांक 87 मधील 2 लाख चौरस फुटाच्या जागा बोगस खरेदीदाराला मान्य करून देण्यासाठी पदाचा गैरवापर पाटील यांनी केला.'' 

"राज्यातील सत्ता गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष भ्रमिष्ट झाल्यासारखे असे वक्तव्य करत आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी त्यांची सत्ता गेल्याने पायाखालची वाळू सरकली आहे,'' अशी टीका शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Criticizes on BJP Leader Chandrakant Patil