Vidhan Sabha 2019 : पुण्यात शिवसेनेच्या वाघांचा बंडखोरीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजप आणि शिवसेनेची युती होऊन एकही जागा पदरात पडत नाही. त्यामुळे शिवसेनेतील वाघांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत दोन माजी आमदारांसह जिल्ह्यातील एक नेता आणि नगरसेवक यांनी अन्य पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 
 

Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजप आणि शिवसेनेची युती होऊन एकही जागा पदरात पडत नाही. त्यामुळे शिवसेनेतील वाघांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत दोन माजी आमदारांसह जिल्ह्यातील एक नेता आणि नगरसेवक यांनी अन्य पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

निवडणुकीसाठी युती होणार की नाही, यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. युती झाली, तर पुण्यातील आठपैकी किमान दोन जागा मिळाव्यात, अशी शहर शिवसेनेची मागणी होती. 'मातोश्री'वरील बैठकीतही शहरातील पदाधिकारी, नेत्यांनी तशी मागणी केली. तेव्हा पक्षश्रेष्ठींनी तुम्ही एकत्र बसून एकमत करा आणि मतदारसंघाची नाव सुचवा, अशी सूचना केली. परंतु मतभेदामुळे एकमत झाले नाही. दरम्यान, युतीची सोमवारी घोषणा झाली. परंतु, आठपैकी एकही मतदारसंघ पक्षाच्या वाट्याला येणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेच्या वाघांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. 

नेत्यांनी अन्य पक्षांतून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा पक्षात होती. दरम्यान, 'मनसे'ही निवडणूक लढविणार असल्याने एक पर्याय खुला झाला आहे. यापूर्वी कोथरूडमधून विजयी झालेले शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पर्यायांवर विचार करून निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी सुरू आहे. मोकाटे म्हणाले, "मी कोणताही विचार केलेला नाही. माझ्या नावाची चर्चा असल्याचे कानावर आले. त्यामुळे चर्चेला काहीच अर्थ नाही.''

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबरही 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते हडपसर येथून इच्छुक आहेत. याबाबत त्यांचा संपर्क झाला नाही. कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 3) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील पक्षाचे एक नेते खडकवासलातून इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत अन्य पक्षांतून उमेदवारीसाठी हलचाली सुरू केल्या आहेत. 

कोणीही पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही
हे दोन्ही नेते पक्ष सोडणार, ही चर्चा आहे. युतीच्या निर्णयावेळी पुण्यात शिवसेनेला दोन जागा मिळतील, अशी आशा आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही. ज्या नावांची चर्चा आहे त्यांनी उच्चपदावर काम केल्याने ते असा निर्णय घेतील, असे वाटत नाही. 
- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena rebel candidate oppose to bjp candidates in Pune for Vidhan Sabha 2019