राज्याभिषेक दिन होणार शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा; राज्य सरकारची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची दोन वेळा भेट घेतली होती. या निर्णयाने झेडपीच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यानुसार दरवर्षी ६ जून हा दिवस राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या पंचायतराज संस्थांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची दोन वेळा भेट घेतली होती. या निर्णयाने झेडपीच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर (ता. जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. यामुळे महाराजांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याबाबतचा ठराव पुणे जिल्हा परिषदेने मंजूर केला होता. एवढेच नव्हे तर, हा शिवस्वराज्य दिन केवळ पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित न राहता, तो राज्यातील सर्व पंचायतराज संस्थांमध्ये साजरा करण्याचा आग्रह जिल्हा परिषदेच्यावतीने अध्यक्षा पानसरे यांनी राज्य सरकारकडे धरला होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ ला झाला होता. हा दिवस म्हणजे स्वराज्याची, सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. अशा या भूमिपुत्रांच्या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी सर्व पंचायतराज संस्थांमध्ये दरवर्षी ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना यश आले आहे, ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा पानसरे यांनी दिली.

या निर्णयानुसार पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी ६ जूनला सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांसमोर गुढी उभारण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन केले जाणार आहे.

हे वाचा - सावधान! पुणेकरांनो कोरोना वाढतोय बरं का, काळजी घ्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivswarajya Day on 6th June in Panchayat Raj Institutions in the state