श्रावण - मनभावन

श्रावण - मनभावन
Published on

श्रावण - मनभावन...


आषाढातल्या पावसाच्या मुसळधार धारा थांबलेल्या असताना त्यालाच बिलगून श्रावणाचे झिरमिरी ऊनपावसाचे दिवस सुरू होतात. सर्व ऋतूत श्रावणाइतका नेत्रसुख आणि आनंददायी ऋतू दुसरा कुठलाही नसेल. श्रावणातील धार्मिक आणि सांस्कृतिक सण, उत्सव, सुगंधी रंगीबेरंगी फुलांची लयलूट, एक सारखा चाललेला ऊन- पावसाचा लपंडाव आणि हिरव्यागार कुरणावर चमचमणारी सोनेरी चकाकी, निसर्ग सौंदर्य आणि मानवी जीवन यांची इतकी काव्यमय गुंफण श्रावणातच बघायला मिळते. ढगाला पाहून पिसारा उघडून नाचणारे मोर, हिरव्या झाडा झुडपातील थेंबांची टपटप, पानांची सळसळ, बगळ्यांच्या आकाशातून उडणाऱ्या रांगा, जिकडे तिकडे आनंदी आनंदच. हा आनंद टिपता येतो तो फक्त श्रावणमासातच.

श्रावणातील सण उत्सवामुळे परिसर प्रसन्न, भारावून टाकणारा वाटतो. उत्सव आपल्याला आवडतात. रोजच्या रूक्ष जीवनातून सुटी देतात. परमानंद बहाल करतात. आपण उत्सवप्रिय आहोत. उत्सव मधुर वाटतात, म्हणून ते सर्व ग्राह्य आहेत. कधी मधी येणारा पाऊस जसा आपल्याला ग्राह्य वाटतो तसे अधून मधून येणारे उत्सव आपल्याला प्रिय वाटतात. या महिन्यात पतेती, स्वातंत्र्य दिन, नागपंचमी, मंगळागौरी पूजन, ईद- ए- मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, पोळा यांसारखे सर्वांना आवडणारे सण येतात. सुकुमार तारुण्य श्रावणाच्या ताजेपणात प्रतिबिंबित झालेले दिसून येते. या ओल्या हिरव्या दिवसात मनाला नवी पालवी फुटते, मन मोहून जाते.

‘‘श्रावण म्हणजे हिरवा ऋतू’’ प्रसन्न अन् सुहास्य मुद्रा असलेलं आभाळाचं गोंडस रूप. श्रावणातील ओलेचिंब करणारा पाऊस, सोबतीला इंद्रधनुष्याची रंगसंगती, शेतमाळ्यातून डोकावणारी रंगीत टपोरी फुलं, मऊ हिरवळ, आकाशात मनमुराद स्वैर भराऱ्या मारणाऱ्या पक्षांचा थवा, हिरव्या गवतातून आपल्या गोजिरवाण्या वासरांसह बागडणाऱ्या गायी मनाला संमोहनी घालतात.

श्रावणात येणाऱ्या नागपंचमीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. भारतीय संस्कृती मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकविते. आपल्या संस्कृतीने पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती सर्वांशी आत्मीय संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे गायीची, कोकिळेची, बैलाची पूजा होते. वटसावित्रीसारख्या व्रतामध्ये वडाची पूजा केली जाते; परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन होते, तेव्हा भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्याची पराकाष्टाच झालेली दिसून येते. गाय, बैल, कोकिळा इत्यादीचे पूजन करून आत्मीयता साधण्याचा आपण प्रयत्न करतो, कारण ते उपयोगी आहेत; परंतु नाग म्हटलं की आपल्याला भीती वाटते. उपद्रवी, जीवघेणा म्हणून त्याचा संदर्भ लावला जातो; परंतु शेतीचे रक्षण करणारा क्षेत्रपाळ म्हणून सापाला संबोधले जाते, याकरिता सापाचे पूजन केले जाते. भारतीय संस्कृतीच्या या विश्वव्यापक गुणामुळेच ती जगात प्रिय आहे.

श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण मोगल काळात सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. राखीचं मूळ शोधत खूप मागे गेलं तर भविष्यपुराण आणि इतर काही पुराणात ओझरता उल्लेख सापडतो.
येन बद्धो बली राजा, दानवेंद्रो महाबल:
तेन त्वामापि बधनामि, रक्षे मा चल, मा चल
हा राखी बांधताना म्हणायचा श्लोक पुराणात सापडतो. या श्लोकावरून पूर्वी राजाला राखी बांधली जायची, नंतर मग रक्षण कर्त्यां राजाच्या बरोबरीनं इतरही रक्षणकर्त्यांना राखी बांधली जाऊ लागली. अलीकडे बहिणीने भावाला राखी बांधण्याचा दृढ झालं. अशा या भावस्पर्शी राखीचा इतिहास याच महिन्यात कानावर पडतो.

नागपूजा, रम्य हिंदोळे, राखी, रेशीम जलधारांमुळे श्रावणासारखे रूप अधिकच लोभस होते. श्रावण बागडत बागडत मातीच्या मांडीवर खेळू लागतो. झाडे डोलायला लागतात. खोपा -खोपा बोलका होतो. पक्षी गिरक्या घेतात अन् आगळीवेगळी जुगलबंदी रानावनात सुरू होते. श्रावण येतो रानभर हुंदडतो. सरीवर सरी येतात- जातात. रानात जादू पसरते. पाहावे तिकडे हिरवेगार गालीचे अंथरलेले दिसतात. रानवेली हिरव्या शालूत नववधूसारख्या सजलेल्या असतात. टपोऱ्या थेंबांचा सडा पडतो. रान सुगंधी होतं. वारा बासरी वाजवतो अन् कृष्णधून रानोमाळ पसरत जाते.
दरवर्षी येणाऱ्या ओल्या हिरव्या दिवसामुळेच श्रावण प्रिय आहे. श्रावण एक उत्सव आहे. श्रावण पक्ष्यांचा खेळ आहे. श्रावण आहे पक्ष्यांची बोली, हळवी, नाजूक रेशीम बोली. मनमोहक, लाघवी श्रावण कुणाला आवडणार नाही? कुणाशी याचं मैत्र जुळणार नाही? श्रावणाचा खरा अर्थ समजून घ्यायचा झाला तर, बालकवींच्या दोन ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत...

देवदर्शना निघती ललना
हर्ष माइना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे
श्रावण महिन्याचे गीत...

प्रासंगिक..
- रा. कों. खेडकर, पेडगाव
99705 83922


प्रासंगिक..
- रा.कों.खेडकर , पेडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com