Paduka Darshan Sohla: ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ यंदा ८ व ९ मार्चला
पुणे, ता. १५ ः एकाचवेळी २१ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडविणारा ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ यंदा मुंबईत मार्चमध्ये होणार आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमांतर्गत या अनुपम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या डोममध्ये आठ आणि नऊ मार्चला हा सोहळा होणार आहे.
भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे.
आपल्या संतांनी आणि सद्गुरूंनी या परंपरेचा जागर करत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखविला. सुदृढ, आरोग्यदायी आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीची वाट आपल्याला दाखवली. या मार्गावर चालण्याचा निर्धार करतानाच या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमाची सुरुवात केली. याच उपक्रमांतर्गत गतवर्षी पहिल्यांदाच ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाविकांना आध्यात्मिक आनंद आणि मनःशांतीची अनुभूती देणाऱ्या या अनोख्या सोहळ्याला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद लाभला होता. हा सोहळा आयोजित करण्यात आलेल्या सिडको प्रदर्शन केंद्राला तर जणू तीर्थक्षेत्राचेच स्वरूप आले होते. टाळ-मृदंगांचा गजर, अखंड हरिनामाचा जप, अभंगांचे सूर, दिंडी-रिंगणाने प्रसन्न झालेले वातावरण यामुळे या भक्तीसोहळ्याने वेगळीच उंची गाठली होती. संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांच्या दर्शनानंतर कृतार्थतेची आणि समाधानाची भावना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात दाटली होती. आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्या मार्गदर्शनाने सोहळ्याचा कळस गाठला गेला.
हाच अनुभव भाविकांना पुन्हा एकदा देण्यासाठी ‘सकाळ’ने यंदाच्या वर्षीही या उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांना २१ संत आणि श्रीगुरूंच्या चरणांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त होणार आहे. यासह या उत्सवात आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन, अग्निहोत्र, ओंकार जप आदी कार्यक्रमही होणार आहेत.
या संत व सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
संत मुक्ताई
संत नामदेव महाराज
संत जनाबाई
संत नरहरी सोनार
संत सेना महाराज
संत सावता माळी
संत एकनाथ महाराज
जगद्गुरू तुकाराम महाराज
संत निळोबाराय
महाअवतार बाबाजी
श्री स्वामी समर्थ
श्री साईबाबा
श्री गजानन महाराज
समर्थ रामदास स्वामी
टेंबे स्वामी महाराज
गोंदवलेकर महाराज
शंकर महाराज
गुळवणी महाराज
सद्गुरू गजानन महाराज
श्रीगुरू बालाजी तांबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.