

श्रीराम कारखाना बंद ठेवण्यासाठी काहींचे प्रयत्न
संजीवराजे; आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थेकडे कारखान्याचे संचालन देण्याचा पर्याय
फलटण, ता. २५ : श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये आणि तो बंद राहिल्यास त्याचा राजकीय व आर्थिक फायदा होईल, या उद्देशाने काही विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन शाहूराजे भोसले, संचालक संतोष खटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘‘सध्या साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. यापूर्वी कारखाना चालवणाऱ्या जवाहर उद्योग समूहाने तो चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखाना बंद पडू नये, तसेच शेतकरी व कामगारांचे नुकसान टाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थेकडे कारखान्याचे संचालन देण्याचा पर्याय पुढे आला होता. यासाठी शरयू अॅग्रो व श्री दत्त इंडिया या दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला होता. त्यापैकी श्री दत्त इंडियाने सर्वाधिक वार्षिक भाड्याचा प्रस्ताव दिल्याने सर्वसाधारण सभेने सर्वानुमते त्यांच्याकडे कारखाना संचालन देण्याचा निर्णय घेतला.’’ हा निर्णय संचालक मंडळाचा नसून जनरल बॉडीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या जीआरनुसार कारखाना सहकारी संस्थेने चालवावा की खासगी संस्थेकडे द्यावा, हा मुद्दा नसून संबंधित संस्था कारखाना कार्यक्षमतेने चालवू शकते का, एवढाच विषय शासनासमोर असतो. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविण्यात आली होती. कारखाना बंद राहिल्यास त्याचा फटका थेट शेतकरी व कामगारांना बसणार असल्याने त्यांचे हित लक्षात घेऊनच सर्व निर्णय घेण्यात आल्याचे संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
चौकट
कारखाना चालविणे हेच मोठे आव्हान
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालविणे हेच मोठे आव्हान असताना भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखाना हा तालुक्यातील सक्षम व प्रगत कारखान्यांपैकी एक असून, त्यांच्याकडे डिस्टिलरी, को-जनरेशनसह विविध पूरक प्रकल्प आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर व वेळेवर सुविधा देण्याची क्षमता त्या संस्थेकडे असल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.