विठ्ठल रूक्मिणी मुर्ती लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा; कोल्हापूर खंड पीठाचा निर्णय

विठ्ठल रूक्मिणी मुर्ती लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा; कोल्हापूर खंड पीठाचा निर्णय
Published on

श्री विठ्ठलाचे छायाचित्र

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा
कोल्हापूर खंडपीठाचा मंदिर समितीच्या बाजूने अंतिम निर्णय

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ७ : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या जतन व संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने शुक्रवारी (ता. ७) विठ्ठल मंदिर समितीच्या बाजूने अंतिम निकाल दिला. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार लवकरच मूर्तीचे जतन व संवर्धन केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज व नुकसान रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या शिफारशीनुसार आवश्यक संवर्धनात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने घेतला होता. या कार्यवाहीला आक्षेप घेत गणेश लंके व इतरांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, तज्ज्ञांचे अहवाल तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींचा सविस्तर विचार करून निकाल दिला. पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ मधील कलम ३२ नुसार मंदिराची संपत्ती, देवता व मूर्ती यांचे संरक्षण, योग्य देखभाल व व्यवस्थापन करण्याची वैधानिक जबाबदारी मंदिर समितीवर असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. मूर्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही समितीची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. मंदिर समितीने कोणताही निर्णय मनमानी पद्धतीने घेतलेला नसून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे कार्यवाही प्रस्तावित केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.
याचिकाकर्त्यांनी मूर्तींवर रासायनिक संरक्षक लेप न करता पारंपरिक वज्रलेप पद्धतीचा अवलंब करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, पारंपरिक वज्रलेपाची विशिष्ट पद्धत, त्यातील घटक, वैज्ञानिक परिणाम किंवा संबंधित शास्त्र/आगम याबाबत ठोस वैज्ञानिक किंवा तांत्रिक सामग्री सादर करण्यात आलेली नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. याउलट मंदिर समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता. त्यामुळे मूर्तीच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीवर आधारित वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याची समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
उपलब्ध कागदपत्रे, तज्ज्ञांचे अहवाल, संबंधित कायदेशीर तरतुदी आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे यांचा विचार केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांमध्ये हस्तक्षेप करण्यास ठोस आधार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि रिट याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित मंदिर समितीच्या भूमिकेला न्यायालयीन अधिमान्यता मिळाली आहे.

चौकट...
मूर्ती संवर्धनाची कार्यवाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पुढील संवर्धनाची कार्यवाही संबंधित तज्ज्ञ संस्था व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत मूर्तीच्या विद्यमान स्थितीचे तांत्रिक दस्तऐवजीकरण, आवश्यक वैज्ञानिक परीक्षण, तज्ज्ञांच्या शिफारशींचे पालन, योग्य प्रक्रिया आणि संवर्धनानंतर नियमित निरीक्षण यांना प्राधान्य देण्यात येईल. मूर्ती संवर्धनाची तारीख मंदिर समितीच्या आगामी सभेत ठरवण्यात येईल, असेही श्री. घम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com