
Shriniwas Patil : इथले लोक शिवरायांना राज्यावर बसवत नव्हते म्हणून गागाभट्टाला आणावे लागले; श्रीनिवास पाटील
सोमेश्वरनगर : शिवराय रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणत. आबाजी सोनदेवने पकडून आणलेल्या मुस्लीम स्त्रीला त्यांनी मातेसमान मानून नजराणा देऊन पाठवण केली. या शिवरायांना इथले लोक त्यांना राज्यावर बसवत नव्हते.
म्हणून त्यांना गागाभट्टाला राज्यभिषेकासाठी आणावं लागलं. राजस्थानच्या सिसोदीया घराण्याशी संबंध जोडून त्यांना क्षत्रियत्व सिध्द करावं लागलं. ज्ञानेश्वरांनाही संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. उच्चकुलीन असल्याचे प्रमाणपत्र आणायला पैठणला जावं लागलं हा खरा इतिहास आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे सरकार यांच्या 262 व्या स्मृतिदिनानिमित्त 'शिंदे सरकार स्नेहमेळावा' आयोजित केला होता.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री शशिकांत शिंदे होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी होळकर, प्रमोद काकडे, सुभाष शिंदे, उद्योजक आर. एन. शिंदे, संभाजीराजे शिंदे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शिवरायांचे एकोणिस अंगरक्षक मुस्लीम होते. तर मिर्झाराजे हा हिंदू रजपूत सरदार स्वराज्य संपवायला तीन लाखांची फौज घेऊन आला होता. कुडतोजी गुजर यांनी या सैन्यात घुसून एकट्याने हल्ला केला.
महाराजा दत्ताजी शिंदे यांचेही धाडस असेच. पाया पडतो सोडा असे नव्हे तर बचेंगे तो और भी लडेंगे असे दत्ताजी म्हणाले. रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत स्वराज्यासाठी त्यांनी लढा दिला. महादजी शिंदे यांना दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी होती पण ती जागा छत्रपतींची हे ते विसरले नाहीत.
ती जागा महादजींना, यशवंतरावांना, शरदरावांना मिळायला हवी होती हा इतिहास आहे. माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, इतिहासावर बोलणं अवघड झालं आहे पण बोलल्याशिवाय रहावत नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना कुणी काय उपमा द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते आमच्या ह्रदयात आहेत.
शिवरायांवरील अलिकडचे चित्रपट बघितले. त्यावरील टिकाटीप्पणी बघीतली आणि समर्थनही पाहिले. इतिहास बदलण्याचा कुणी प्रयत्न केला तरी लोकांच्या ह्रदयातील स्थान कुणी काढून घेऊ शकत नाही. पानिपत सिनेमामध्ये शिंदे फक्त बचेंगे तो और भी लडेंगे या वाक्यापुरतेच आहेत. म्हणून आता आपला इतिहास आपणच जपला पाहिजे.
महादजी शिंदे यांनी दिल्लीचे तख्त काबीज केले, मंदिरांची पुनर्बांधणी केली. शिवरायांना साथ देताना शिंदे परिवार देशभर विखुरला आहे तो एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या मुख्यमंत्री पण शिंदे आहेत. त्या शिंद्यांनी जर निधी दिला तर महादजी शिंदे यांचा सन्मान होईल. कण्हेरखेड येथे महाराजा महादजी शिंदे यांचे स्मारक उभे करण्यासाठी सरकारची मदत आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्योजक संजय शिंदे, महेश शिंदे, हेमंत शिंदे, निलेश शिंदे, उन्मेश शिंदे आदींनी संयोजन केले. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. युवराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास शिंदे यांनी आभार मानले.
शहीद अशोक कामठेंना शौर्य पुरस्कार
रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे शौर्य पुरस्कार शहीद अशोक कामठे यांना मरणोत्तर देण्यात आला. तसेच करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे, वेबसिरीज अभिनेते भरत शिंदे, राज्य कर निरीक्षक मंगेश शिंदे, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, हवामान तज्ञ बापूसाहेब शिंदे, व्याख्याते गणेश शिंदे, डेअरीचालक रणजित दत्तात्रय शिंदे, तिरंगा स्कूलचे रणजित पोपट शिंदे, उद्योजक अजित शिंदे, पृथ्वीराज शिंदे, जनार्दन शिंदे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.