बंधुभावाशिवाय स्वातंत्र्य-समता अर्थहीन - डॉ. सबनीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय ही चार मूलभूत तत्त्वे दिली; परंतु आपल्याकडून केवळ स्वातंत्र्य, समता यावरच जास्त भर देण्यात आला. मात्र, बंधुभावाशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशनाच्या वतीने डॉ. सबनीस यांचा माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे आदी उपस्थित होते. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘जगभरातील परिस्थिती पाहता समाजात बंधुभाव पेरण्याची गरज आहे. आपला समाज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष अशा भेदभावामध्ये विखुरला गेला आहे. अशात बंधुतेचा विचार काळजाला भिडला, तरच बंधुतेचा नकाशा आपल्याला कायम ठेवता येईल.’’

सत्कार समारंभानंतर आयोजित प्रबोधनयात्री कविसंमेलनात संदीप कांबळे, बबन धुमाळ, विजय जाधव, डॉ. भीम गायकवाड, संतोष घुले या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

Web Title: Shripal Sabnis Talking