

शिरूर, ता. २९ : रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने सातजणांच्या टोळक्याने एका मोटारचालकाला बेदम मारहाण केली. या टोळक्याने जाताना मोटारीवर दगड घालत दहशत निर्माण केली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) परिसरातील खंडाळे माथा परिसरात मंगळवारी (ता. २७) सायंकाळी ही घटना घडली.
अतुल दिलीप पाचुंदकर (वय ३६, रा. रांजणगाव गणपती) हे या मारहाणीत जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गौरव बोऱ्हाडे (रा. बोऱ्हाडे मळा, ता. शिरूर), विजय भालेराव (रा. ढोकसांगवी, ता. शिरूर), कुणाल पाटील (रा. रांजणगाव गणपती) व रोहित बहिरट (रा. न्हावरे, ता. शिरूर) यांच्यासह त्यांच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी बेकायदा गर्दी जमाव जमवून दहशत पसरविणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अतुल पाचुंदकर हे मंगळवारी दुपारी त्यांचे चुलत बंधू कानिफनाथ पाचुंदकर यांच्या उसाच्या शेतात उस पीक पाहण्यासाठी गेले होते. काही वेळ तेथे थांबल्यानंतर ते स्वतःच्या मोटारीतून खंडाळे माथा येथील आपल्या शेतातील उसाचे पीक पाहण्यासाठी निघाले असता ‘वक्रतुंड पार्क’जवळील रस्त्यावर एक दुचाकी उभी होती. त्यावेळी पाचुंदकर यांनी मोटार थांबवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघा तरुणांकडे विचारणा करीत दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. दरम्यान, त्या तरुणांपैकी एकाने दुचाकी बाजूला घेण्याचा बहाणा करीत पाचुंदकर यांना त्यांच्या मोटारीपुढे काहीतरी पडल्याचे सांगितले. पाचुंदकर यांनी मोटारीतून उतरून पाहिले असता काहीही नव्हाते. त्यामुळे, ‘टिंगल कशासाठी करता?’ असा जाब विचारला. त्यातून त्या तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी त्याच परिसरातील बनसोडे कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील एका कार्यालयातून आणखी तीनजण धावत आले. त्यांनी पाचुंदकर यांच्याशी उद्धटपणे बोलत मारहाण केली.
दहशत माजविण्यासाठी या टोळक्याने पाचुंदकर यांच्या मोटारीच्या पुढील व मागील बाजूंवर दगड घालून काचा फोडल्या, दर्शनी भाग चेंबवला. या प्रकारानंतर पाचुंदकर यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. या गोंधळात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील घड्याळही पडून गहाळ झाले असल्याचे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.