

शिरूर, ता. २८ : शिरूर बाह्यवळण मार्गावर तीन तरुणांच्या बळीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. ''सकाळ''च्या वृत्ताने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआयडीसीने युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू केली आहे. स्थानिकांसह व्यावसायिकांनी सोयीसाठी पाडलेली दुभाजकांमधील खिंडारे आता बुजवली जात आहेत.
सलगच्या भीषण अपघातांनंतर शिरूर पोलिसांनी तातडीने बाह्यवळण मार्गावरील अनधिकृत कट बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रांजणगाव, कारेगाव, फलकेमळा, सरदवाडी, घावटेमळा या परिसरात व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी पाडलेली दुभाजकांमधील खिंडारे सिमेंट काँक्रीट, विटा व पेव्हिंग ब्लॉक वापरून वेगाने बुजवली जात आहेत. नगर विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवातीला बाह्यवळण मार्गावरील तीन प्रवेशमार्ग बंद केले होते.
एमएसआयडीसीचे उपअभियंता राहुल कुलकर्णी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २८) शिरूर ते कारेगावपर्यंतच्या मार्गाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. गेल्या ११ दिवसांपासून या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांचीही अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना कामाबद्दल माहिती दिली. महामार्गावरील धोकादायक स्थिती, अपघातांची मालिका आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी आवाज उठवला होता.
पोलिसी कारवाई
दुभाजकांची बेकायदा तोडफोड केल्याप्रकरणी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांचे जबाब नोंदवून दोषींचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघातांची मालिका
शिरूर बाह्यवळण मार्गावर मंगळवारी (ता. ११) झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात उद्योजक किशोर नामदेव यादव (वय ३८) व प्रथमेश प्रकाश लाड (वय ३३) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, सोमवारी (ता. १७) याच मार्गावर व्यावसायिक सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३०) यांना मोटारीने धडक दिल्याने त्यांचाही बळी गेला.
पहिल्या टप्प्यात सिमेंट काँक्रीटचा वापर करून सर्व अनधिकृत प्रवेशमार्ग कायमस्वरूपी बंद केले जात आहेत. हे काम पूर्ण होताच दूभाजकावरील खड्डे, अनधिकृत कट आणि लोखंडी रेलिंग सह इतर दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील. मार्गाची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्यावर आहे.
- राहुल कुलकर्णी, उपअभियंता, एमएसआयडीसी
महामार्गावरील धोके
डांबरीकरणामुळे रस्त्यात गाडले गेलेले दुभाजक.
कमी उंचीच्या दुभाजकांवरून दुचाकी घालण्याचे प्रकार.
दुभाजकांवर वाढलेली झाडी आणि तुटलेले रेलिंग.
अनेक ठिकाणचे रिफ्लेक्टर्स गायब झाल्याने रात्रीचा धोका.
फोटो ऒळी : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : पुणे - नगर रस्त्यावरील दूभाजकाला पाडलेली खिंडारे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
फलके मळा (ता. शिरूर) : पुणे - नगर रस्त्यावरील दूभाजकाला पाडलेली खिंडारे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.