

टॉपचे फरार १२ गुन्हेगार गजाआड!
श्रीरामपूर विभागात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ ः १२० हून अधिक आरोपी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. १२ : श्रीरामपूर विभागातील १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (ता. ११) राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील १२ फरार व पाहिजे आरोपींना जेरबंद केले, तसेच अवैध शस्त्रे, गांजा, दारू, जुगार-मटका आणि वाहतूक नियमभंगाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली, तसेच उत्तर विभागात विविध गुन्ह्यांतील १२० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून फरार व परागंदा असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. त्यात कोपरगाव तालुका ३, राहुरी २, तर श्रीरामपूर शहर व तालुका, नेवासा, कोपरगाव शहर, शिर्डी, लोणी व अकोले येथून प्रत्येकी एक समावेश आहे. कोपरगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील कपील राजू पिंपळे (वय २८) व राहुरीतील यश विठ्ठल जगधने (वय २६) यांना तलवारीसह ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. श्रीरामपूर शहरातील उपाध्ये मळा परिसरात मयूर राजेंद्र वाघ व त्याच्या दोन साथीदारांकडून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला चार किलो गांजा आणि मोटरकार असा पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑपरेशनदरम्यान अवैध दारुविक्री व वाहतुकीप्रकरणी ४० गुन्हे, तर मटका-जुगाराविरोधात १८ गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेतही पोलिसांनी विशेष मोहीम राबवत १०० अजामीनपात्र वॉरंट, १४६ जामीनपात्र वॉरंट आणि ३३८ समन्स बजावले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ३२२ कारवाया करून दोन लाख पाच हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तीन चालकांविरोधात ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.