श्रीरामपूरला आता आठवड्यातून दोनदा पाणी

श्रीरामपूरला आता आठवड्यातून दोनदा पाणी
Published on: 

श्रीरामपूरला आता आठवड्यातून दोनदा पाणी

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांतून आवर्तन १५ दिवस आधी; ​२५ ठिकाणी टाक्यांसह टँकरची सोय

सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. ३१ : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून १५ डिसेंबरला सोडण्यात येणारे आवर्तन आता १५ दिवस अलीकडे आणत १ डिसेंबरला सोडण्यास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून, आता शहरात सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे.
​यासंदर्भात नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे, दिलीप नागरे, योगेश जाधव, दीपक वमने, श्याम अडांगळे, वैशाली चव्हाण, शशांक रासकर, लकी सेठी आदी उपस्थित होते.
आमदार ओगले यांनी सांगितले की, शहराची टंचाई लक्षात घेऊन पालकमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आवर्तनाची तारीख अलीकडे आणण्याचा निर्णय झाला, तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराशी चर्चा करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचे ठरविले आहे. नियोजनानुसार, ९० कोटी लिटर क्षमतेच्या संतुलन जलकुंभाचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत, तर संपूर्ण योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पाणीटंचाईवर तातडीची उपाययोजना म्हणून मोठ्या वस्त्या व झोपडपट्टी भागांत ५ हजार लिटर क्षमतेच्या सुमारे २५ टाक्या बसविण्यात येत आहेत. पालिकेच्या टँकरव्यतिरिक्त आणखी १५ टँकर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे, ​तसेच आमदार निधीतून १५ लाख रुपये पाणीटंचाईच्या कामासाठी दिले जाणार आहेत. शहराच्या साठवण तलावासह दिघी, शिरसगाव आणि बेलापूर येथील साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे. भविष्यातील वाढती एमआयडीसी व शहराची गरज लक्षात घेऊन, स्व. जयंत ससाणे यांच्या कार्यकाळात भंडारदरा धरणासोबतच मुळा धरणातूनही पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, ज्यावर मुख्यमंत्र्यांनीही अनुकूल शिफारस केली असल्याचे आमदार ओगले यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष ससाणे यांनी सांगितले की, सध्या पालिकेचे ५ टँकर सुरू असून, स्व. जयंत ससाणे मित्र मंडळाच्या वतीने आणखी ५ टँकरची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करून आवर्तन काळात दररोज पाणी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ​

------

उपोषणाची दखल; विखेंचे आभार
‘व्याकूळ श्रीरामपूरकर’च्या उपोषणानंतर आवर्तन लवकर सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल संयोजक केतन खोरे, संजय छल्लारे, रवींद्र गुलाटी व सहकाऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.