

शिरूर, ता. ४ : गोठ्यात किंवा घराबाहेर बांधलेली पाळीव जनावरे चोरून त्यांची कत्तलखान्यात विक्री करणाऱ्या दोघांना शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. यात जनावरे चोरणारा एक आणि चोरीचे पशुधन विकत घेणारा दुसरा संशयित आहे. दरम्यान, शिरूर न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रामनाथ सलिम भोसले (वय ३१, रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर), जावेद बब्बन पठाण (वय ३७, रा. वाळकी, ता. जि. अहिल्यानगर) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी, एक लाख रुपयांचे दोन बैल आणि साडेपाच लाख रुपयांची पिकअप जीप असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी (ता. शिरूर) हद्दीत करडे घाट परिसरात दादाभाऊ मगर यांच्या शेताजवळ पाल टाकून राहणाऱ्या एका कुटुंबाच्या दोन म्हशी १२ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
उपनिरीक्षक शुभम चव्हाण, अक्षय कळमकर व पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रामनाथ भोसले याला शिरूर बाजारपेठेत सापळा लावून पकडले. चौकशीत त्याने करडे घाट व शिरूर परिसरातून जनावरे चोरल्याची कबुली दिली. ही जनावरे त्याने वाळकी येथील जावेद पठाण याला विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पठाणलाही अटक करून जनावरे हस्तगत केली. पोलिस अंमलदार अक्षय कळमकर पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.