

शिरूर, ता. ४ : गोवा राज्यातील विदेशी मद्य महाराष्ट्रात आणून त्याची चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला २५ लाख ५१ हजार ६५० रुपयांचा मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. कारेगाव-करडे रस्त्यालगत वृंदावन मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. ३) पहाटे दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मद्य वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
या प्रकरणी संदीप नानाभाऊ रणपिसे (वय ४४, रा. पोंदेवाडी, ता. आंबेगाव) व रमेश कांताराम जगताप (वय २५, रा. कारेगाव; मूळ रा. दानेवाडी, राजापूर, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (क्र. एमएच १२ आरएन ९९०७) आणि मोटार (एमएच १२ पीसी २९८२) ताब्यात घेण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने कारेगाव परिसरात सापळा रचून छापा टाकला. परराज्यातून कमी दरात मद्य आणून महाराष्ट्रात विक्री करणे किंवा रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून मूळ कंपनीचे असल्याचे भासवून विकण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असे विभागाने नमूद केले. मुंबई दारूबंदी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक आर. आर. कोले, उपअधीक्षक सुजित पाटील व गणेश कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर विभागाचे निरीक्षक एम. एन. झेंडे यांच्या पथकाने केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. शिंदे, के. टी. डुंबरे, एस. एस. बाली, जवान बी. एस. रणसुरे, एम. पी. बनसोडे, एम. एस. पोटे तसेच महिला जवान यू. आर. वारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक एम. एन. झेंडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.