दौंडमधील सिद्धेश खळदे एनडीएच्या परीक्षेत देशात 19 वा

संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीसाठीच्या (एनडीए) परीक्षेत देवकरवाडी (ता. दौंड) येथील सिद्धेश दीपक खळदे याने देशात 19 वा क्रमांक पटकाविला.

राहू (पुणे) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीसाठीच्या (एनडीए) परीक्षेत देवकरवाडी (ता. दौंड) येथील सिद्धेश दीपक खळदे याने देशात 19 वा क्रमांक पटकाविला.

तिन्ही सैन्य दलातील उमेदवारांच्या निवडीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी परीक्षा व मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर 447 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना पुणे (खडकवासला) येथे अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणासोबत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सिद्धेश खळदे याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण देवकरवाडी, तर माध्यमिक शिक्षण वाघोलीतील प्रोडीजी पब्लिक स्कूलमध्ये झाले. सिद्धेशला एसपीआय औरंगाबाद संस्थेचे लेफ्टनंट कर्नल उदय पोळ, कर्नल अमित दळवी, राजू मानेकर, नलावडे, सचिन जोग, कर्नल बोरसकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिद्धेश याच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.

"सिद्धेशचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण'
सिद्धेश हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे देशसेवा करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण होत असून आम्ही त्याला देशसेवेसाठी पाठवीत आहोत. पहिल्याच प्रयत्नांत त्याने यश मिळविले, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सिद्धेशच्या आई ज्योती व वडील दीपक खळदे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhesh Khalde of Daund is the 19th in the NDA exam