माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरास पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट : संवर्धन व संरचनात्मक दुरुस्तीच्या दृष्टीने सविस्तर पाहणी

माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरास पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट : संवर्धन व संरचनात्मक दुरुस्तीच्या दृष्टीने सविस्तर पाहणी

Published on

MGV26B15475
माचणूर (ता. मंगळवेढा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराची पाहणी करताना एएसआय अधिकारी गजानन मंडवळे, ॲड. अर्जुन पाटील, प्रशांत साळे, सुनील डोके, राहुल घुले व उपस्थित मान्यवर.


माचणूरच्या मंदिराची मूळ रचना अन् संरक्षित क्षेत्राची तपासणी
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली मंदिराची पाहणी;

मंगळवेढा, ता. ३ ः माचणूर (ता. मंगळवेढा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिरास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत सविस्तर पाहणी केली. मंदिराच्या संवर्धन व प्रस्तावित विकासकामांच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. एएसआयचे अधिकारी गजानन मंडवळे यांनी मंदिराच्या मूळ दगडी रचनेची, सभोवतालच्या संरक्षित क्षेत्राची तसेच संभाव्य विकास आराखड्याची बारकाईने तपासणी केली.

माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या संरचनात्मक मजबुतीकरणासोबतच जीर्ण भागांची दुरुस्ती, परिसरातील सुरक्षाव्यवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत प्राथमिक सूचना देण्यात आल्या. संरक्षित स्मारकांबाबत कोणतेही विकासकाम हाती घेताना एएसआयची पूर्वपरवानगी आवश्यक असते. प्रस्तावित कामांमुळे मंदिराच्या मूळ वास्तुरचनेवर अथवा नियमन क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची खात्री करूनच पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील (ब्रह्मपुरीकर), सुनील डोके, दीपक कलुबर्मे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, ॲड. राहुल घुले, बबनराव सरवळे, रणजित पाटील, रवींद्र पुजारी, मारुती डोके तसेच माचणूर व ब्रह्मपुरी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून उजनी जलपर्यटन योजनेंतर्गत ५ कोटी ४ लाखांच्या निधीच्या पार्श्वभूमीवर संवर्धन प्रक्रियेला वेग आला आहे. वारसा जतनासोबतच पर्यटनवाढ व स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोट
-श्री सिद्धेश्वर मंदिर हे माचणूरचे धार्मिक वैभव आहे. एएसआय अधिकाऱ्यांच्या पाहणीमुळे संवर्धन प्रक्रियेला गती मिळाली आहे. मंजूर निधीचा योग्य वापर करून मंदिराची मूळ ओळख जपत विकासकामे पूर्ण करण्यात येतील. या कामांमुळे पर्यटन वाढून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
-ॲड. अर्जुन पाटील, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस

Marathi News Esakal
www.esakal.com